मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

वारीनंतरच्या अस्वच्छतेला वारकरीच जबाबदार- हायकोर्ट

वारीनंतरच्या अस्वच्छतेला वारकरीच जबाबदार- हायकोर्ट

Wari highcourt

19 नोव्हेंबर : आषाढी किंवा कार्तिकी वारीनंतर पंढरपूरमध्ये होणार्‍या अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचे मत मुंबई हायकोर्टाने मांडले आहे. मुंबई हायकोर्टाने नेमलेल्या समितीने दिलेल्या अहवालाच्या आधारे न्यायाधीशांनी हे मत मांडले आहे. पुढील सुनावणीच्या वेळी विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती तसेच वारकरी संघटनांच्या प्रतिनिधींना न्यायालयात हजर राहण्याचा आदेश मुंबई हायकोर्टाने मंगळवारी दिला.

वारीनंतर पंढरपूरमध्ये होणार्‍या अस्वच्छतेविरोधात मुंबई हायकोर्टात एक याचिका दाखल असून यासंदर्भात हायकोर्टाने 2 वकिलांची नियुक्ती करत अहवाल मागवला होता. या समितीने न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती अजय गडकरी यांच्या खंडपीठासमोर काल (मंगळवारी) हा अहवाल सादर केला. या अहवालाच्या आधारे हायकोर्टाने अस्वच्छतेसाठी वारकरीच जबाबदार असल्याचा ठपका ठेवला आहे. 'वारकरी स्वच्छतागृह असतानाही त्याचा वापर करत नाही आणि त्यामुळेच शहर आणि नदीकाठी घाणीचे साम्राज्य पसरते. शिवाय याबाबत विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीकडून काहीच कार्यवाही केली जात नाही. हायकोर्टाच्या आदेशानंतरही समितीने कसलीही हालचाल केलेली नाही, असे ताशेरे हायकोर्टाने ओढले आहेत. तसंच या अहवालात काही शिफारसीही मांडण्यात आल्या आहेत. कट्टे लावून उभारलेल्या शौचालयांवर पूर्ण बंदी, 250 मठांवर शौचालये बांधण्याची सक्ती, वाळवंटात राहण्यास, व्यवसाय करण्यास परवानगी नको, विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचा सहभाग अनिवार्य अशा शिफारसी या अहवालात मांडण्यात आल्या आहेत.

या अहवालाच्या आधारे पुढील सुनावणीत पंढरपूर शहर स्वच्छ ठेवण्यासंदर्भात निर्देश दिले जातील. या सुनावणीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती आणि वारकरी संघटनाचे प्रतिनिधी यांना हजर राहण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pandharpur, Wari, पंढरपूर, मुंबई हायकोर्ट, वारी

पुढील बातम्या