Home /News /news /

वरुणराजे प्रसन्न, विदर्भात पाऊस'फुल्ल';मराठवाड्यातही हजेरी

वरुणराजे प्रसन्न, विदर्भात पाऊस'फुल्ल';मराठवाड्यातही हजेरी

amravati_rain23 जुलै : अखेर विदर्भ,मराठवाडा आणि खान्देशात वरुणराजानी कृपादृष्टी टाकलीय. गेल्या दोन दिवसांपासून विदर्भात पावसाने दमदार हजेरी लावलीय. अमरावती, गडचिरोली, वर्धा, भंडार्‍यासह मराठवाड्यात पावसाने जोर धरलाय. मुंबई कोकण वगळता जून महिना उलटल्यानंतर जुलैच्या अखेरीस पावसाने हजेरी लावलीय. राज्यात आतापर्यंत सरासरी 47 टक्के पाऊस झाल्याने पेरण्यांना जोरदार सुरुवात झालीय. राज्यात आत्तापर्यंत 36 टक्के पेरण्या झाल्या आहे. सिंधुदुर्ग आणि सांगली जिल्ह्यात सर्वाधिक 75 ते 100 टक्के पावसाची नोंद झालीय. सर्वात कमी पाऊस नाशिक, नंदूरबार, नांदेड, हिंगोली, बुलढाणा, यवतमाळ या जिल्ह्यात झालाय. अमरावतीत पुरात दोन पुजारीसह दोन मुलं अडकले अमरावती गेल्या तीन दिवसापासून सुरू असलेल्या संततधार पावसाने लोकांचे जनजीवन विस्कळीत झालं आहे. मुसळधार पावसामुळे पेढी नदीला पूर आला आहे. या पुराच्या पाण्याने रेवसा गावातील साई मंदिराला वेढले असून मंदिरातील दोन पुजारीसह दोन मुल अडकले आहेत. सकाळपासून मंदिरात अडकलेल्या या चार जणांचा जीव टांगणीवरच आहे. दरवर्षी पेढी नदीला पूर येऊन रेवसा गावाला पुराचा फटका सहन करावा लागतो दरवर्षी या गावातील लोकं पुराने बाधित होत असतात. मात्र प्रशासनाकडून कुठलीही दखल घेण्यात येत नाही .पावसामुळे चांदूर रेल्वे तालुक्यातील बग्गी गावामध्ये घर कोसळून दोघांचा मृत्यू झालाय तर अचलपूर मध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू झाला आहे. शहरामध्येही काही घरांमध्ये पाणी शिरल्याने भिंती आणि घर कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. शहरातील बेनोडा परिसरात भीम टेकडीची भिंत कोसळून चार जन जखमी झाले आहे. वर्ध्यात मुसळधार वर्ध्या जिल्ह्यातही मुसळधार पाऊस सुरू आहे. मनसावळी-अल्लीपूर मार्ग बंद करण्यात आला आहे. यशोदा नदीला पूर आला आहे. त्यामुळे नदीकाठच्या 22 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. निम्न वर्धा धरणाचे 5 दरवाजे उघडण्यात आले आहेत. मुसळधार पावसामुळे कारंजा इथं अंगावर गोठ्याची भिंत पडल्यानं एकाचा मृत्यू झाला आहे. भंडार्‍यात गावाचं झालंय तलाव भंडारा जिल्ह्यात मागच्या 48 तासापासून संततधार सुरू आहे. त्यामुळे तुमसर तालुक्यातील सिंदेवाही गावातल्या मामा तलावाची पार फुटल्यानं संपूर्ण गावात पाणी शिरलंय. गावाला आता तलावाचं स्वरूप आलंय. जवळ पास 150 घरात पाणी शिरलंय. मुसळधार पावसामुळे तलाव पूर्ण भरला आणि रात्री 3 च्या दरम्यान पाण्याचा दाब वाढल्यामुळे तलावाची पार फुटली या घटनेची माहिती मिळताच प्रशासन गावात पोहचले आहे आणि लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात येतंय. लोकांची सध्या राहण्याची आणि जेवणाची सोय प्रशासनामार्फत केली जात आहे या क्षेत्रात काल 166 मी मी ऐवढा पाऊस पडला. सध्या कोणतीही जीवितहानी झालेले नाही. 50 ते 60 हेक्टरमध्ये हा तलाव पसरलेला आहे. पावसामुळे तलाव फुटू शकतो असे समजताच स्थानिक लोकांनीच पार चांगली करण्याचे प्रयत्न केले मात्र मध्ये रात्री 3 वाजेला दुसर्‍या भागावरून पार फुटल्याने हा सर्व पाणी गावात शिरला आहे. यामुळे जरी जीवितहानी झाली नसली तरी गावकर्‍यांचे संपूर्ण अन्न धान्य यामुळे खराब झाल्याने आणि घरांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने शासनाने गावकर्‍यांची 2 महिन्यापर्यंत राहण्याची आणि खाण्याची व्यवस्था करण्याची मागणी लोकांनी केली आहे. नागपुरात संततधार, गोसीखुर्दचे 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडले सलग चौथ्या दिवशीही नागपुरातही संततधार सुरूच आहे. शहरात काही भागात पाणी साचलंय गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या पावसामुळे गोसीखुर्द धरणाचा जलसाठा वाढला असून धरणाचे सर्व 33 दरवाजे अर्ध्या मीटरने उघडण्यात आले आहे. गोंदिया जिल्ह्यातील पुजारीटोलाची सात आणि कोसीसराडची चार आणि वर्धा जिल्ह्यातील लालनालाची पाच, नांद आणि पोथरा धरणाची दोन - दोन दारे उघडण्यात आली आहेत. भंडारा-गोंदियासह मध्य प्रदेश आणि छत्तीसगढमध्येही अतिवृष्टी झाल्याने वाहतूक खोळंबली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील पर्लकोटा नदीचा पूर ओसरला नसल्याने 150 गावांचा संपर्क तुटला आहे. तर अमरावती जिल्ह्यातील मोर्शी येथील अप्पर वर्धा धरण 70 टक्के भरले आहे. जवळच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुराच्या पाण्यामुळे नागपूर, गोंदिया आणि भंडारा जिल्ह्यात तीन जण वाहून गेले आहेत. गोंदिया जिल्ह्यातील सालेकसा मरकाखांदा इथं श्रीराम केशव नवखरे ही 62 वर्षाची व्यक्ती वाहून गेली. तर भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील विहिरगाव - टांगा नाल्याच्या पुलावरून पाणी वाहत असल्यामुळे भय्याजी तिजारे ही व्यक्ती वाहून गेली. तर नागपूरच्या हुडकेश्वर येथील नरसाळा येथील पावसाच्या पाणी शिरलेल्या खड्डयात पडल्यामुळे एका वृद्धाचा मृत्यू झाला आहे. मराठवाड्यात अखेर वरुणराजे बरसले मराठवाड्यात जुलैच्या अखेरीस पावसानं हजेरी लावलीय. गेल्या 20 ते 22 तासांपासून मराठवाड्यावर पावसाची रिमझिम सुरू आहे. मोठा पाऊस पडला नसला तरी सततच्या रिमझिम पावसामुळे मराठवाड्यातील पेरणीच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. जुनच्या सुरुवातीला शेतकर्‍यांनी पेरलेलं बियानं अनेक ठिकाणी पावसाअभावी उगवलं नाही. मात्र आता सततच्या रिमझिम पावसाने पेरणीला अनूकुल वातावरण निर्माण झाल्यानं शेतकर्‍यांच्या आशा वाढल्या आहेत. बीड, नांदेड, परभणी आणि उस्मानाबाद नांदेडमध्ये पाऊस पडतोय. हवामान खात्याच्या अंदाजानुसार अजून 48 तास चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. रिमझिम पावसामुळे पेरणीचं वातावरण असलं तरी..मराठवाड्याला मोठ्या पावसाची गरज आहे. कारण मराठवाड्यातील धरणांमध्ये अजून पाणी येण्यास सुरुवात झालेली नाही. उस्मानाबादेत रिमझिम उस्मानाबाद जिल्ह्यात रिमझिम पाऊस सुरू असल्याने शेतकर्‍यांना दिलासा मिळालाय. मागच्या 8 दिवसापासून ढगाळ वातावरण होतं. पण पाऊस काही पडत नव्हता आता पावसाने हजेरी लावलीय. तरी शेतकरी मोठ्या पावसाच्या प्रतिक्षेत आहेत. तर परभणीमध्येही पावसाची रिमझिम सुरू आहे. शेतकरी या पावसामुळे सुखावला आहे. पाऊस नसल्याने शेतकर्‍यांवर दुपार पेरणीचं संकट आलं होतं. आता पावसानं दमदार हजेरी लावल्यानं पेरण्यांसाठी अनुकूल परिस्थिती निर्माण झालीय. जळगावमध्ये हतनूर धरणाचे 41 दरवाजे उघडले मध्य प्रदेशात गेल्या 24 तासात झालेल्या मुसळधार पावसामुळे जळगाव जिल्ह्यातील हतनूर धरणाचे 41 दरवाजे पूर्ण क्षमतेनं उघडण्यात आले आहे. भुसावळ तालुक्यात असलेल्या तापी नदी किनारी न जाण्याचं आवाहन करण्यात आलंय. मध्य प्रदेशातील हतनूर धरणाच्या कॅचमेंट एरियात गेल्या 24 तासात 200 मिलीमिटर पाऊस झालाय. जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील हतनूर धरणाचे सर्व दरवाजे आज दुपारी 12 वाजता उघडण्यात आले आहेत. त्यामुळे धरणाचे सर्वच्या सर्व 41 दरवाजे पूर्ण क्षमतेने उघडले आहेत. 3 लाख 14 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू झालाय. येत्या 24 तासात मध्य प्रदेशात जर पावसाचा जोर कमी झाला नाही तर गंभीर पूर परिस्थितीला सामोरं जावं लागू शकतं. तापी नदी किनारी न जाण्याचा इशारा देण्यात आला आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Water, Water crisis, उस्मानाबाद, गडचिरोली, मराठवाड्यात, मान्सून, वर्धा, विदर्भ

पुढील बातम्या