मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

अरविंद केजरीवाल हे हुकुमशहा - प्रशांत भूषण

अरविंद केजरीवाल हे हुकुमशहा - प्रशांत भूषण

aap war

27 मार्च : अरविंद केजरीवाल हे हुकुमशहा असून पक्षात त्यांचाच शब्द अंतिम मानला जावा अशी त्यांची इच्छा आहे असा आरोप प्रशांत भूषण यांनी केला आहे. आमच्याकडून राजीनामा मागण्यात आला होता, मात्र आम्ही पक्षाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला नाही असे स्पष्टीकरण योगेंद्र यादव यांनी दिले आहे.

दिल्लीत प्रचंड बहुमताने सत्तेवर आलेल्या आपमधील अंतर्गत संघर्ष शिगेला पोहोचला आहे. केजरीवाल यांच्याशी टक्कर घेतल्याची जबर किंमत यादव आणि भूषण यांना मोजावी लागली आहे. येत्या 28 मार्चला होणार्‍या ‘आप’च्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक वादळी ठरेल आणि त्यात केजरीवाल बाकीच्या विरोधकांनाही बाहेरचा रस्ता दाखवतील अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. या घटनांच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी दिल्लीत योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी संयुक्त पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका मांडली.

आंदोलनामधून ‘आप’चा उदय झालेला असून, हा संघर्ष स्वराज्यासाठी आहे. अनेक मुद्यांवर जनता पक्षाशी जोडली गेली आहे. मात्र, गेल्या महिन्याभरात पक्षामध्ये बर्‍याच घटना घडल्या आहेत. पक्षाने कार्यकर्त्यांचे म्हणणे ऐकून घ्यायला हवे असे मत त्यांनी मांडले. आमच्या विश्वासाला तडे गेले आहेत. राष्ट्रीय समन्वयक कोण असेल हा मुद्दा आम्ही कधीच मांडला नाही. आम्ही कुठल्या समितीत असणं, नसणं हा मोठा मुद्दा नाही असंही त्यांनी स्पष्ट केले. अरविंद केजरीवाल हे हुकूमशहा असून, पक्षात त्यांचा शब्द अंतिम मानला जावा अशी त्यांची इच्छा आहे. आमच्याकडून सतत राजीनामा देण्याची मागणी करण्यात आली. मात्र, आम्ही पक्षाच्या कार्यकारिणीचा राजीनामा दिलेला नाही अशी स्पष्टोक्ती दोघांनी दिली.

दरम्यान, आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांनी मुख्यमंत्री झाल्यावर पक्षाचे संयोजकपद सोडावे, अशी मागणी योगेंद्र यादव आणि प्रशांत भूषण लावून धरली होती. यादव आणि भूषण यांची राष्ट्रीय कार्यकारिणीतून हकालपट्टी करण्यात आल्याचे कुमार विश्वास यांनी गुरुवारी रात्री जाहीर केले होते. पक्षाच्या राजकीय व्यवहार समितीच्या (पीएसी) बैठकीत हा निर्णय झाल्याचे विश्वास यांनी म्हटले होते.

++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: AAP, Arvind kejriwal, Prashant bhushan, आप, आम आदमी पार्टी, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव