मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

राज-गडकरी भेटीमुळे महायुतीत अस्वस्थता !

राज-गडकरी भेटीमुळे महायुतीत अस्वस्थता !

प्रफुल्ल साळुंखे, मुंबई

04 मार्च : महायुती भक्कम करण्याचे प्रयत्न गोपीनाथ मुंडे, उद्धव ठाकरे आणि रामदास आठवले यांच्याकडून होत असताना नितीन गडकरी आणि राज ठाकरे यांच्या भेटीमुळे वातावरण ढवळून निघालंय. राज यांच्या महायुतीतल्या प्रवेशाला शिवसेनेन नकार दिलाय. विश्वासात न घेतल्याबद्दल आठवलेंनीही नाराजी व्यक्त केली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि भाजपचे माजी अध्यक्ष नितीन गडकरी यांनी सोमवारी दुपारी मुंबईतल्या एका फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये भेट घेतली आणि राज्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली. यापूर्वी मनसे महायुतीत यावं यासाठी मुंडेंनी प्रयत्न केला होता. पण शिवसेनेनं दाद दिली नाही, त्यामुळे त्यांना हा नाद सोडून द्यावा लागला होता. त्यानंतर महायुतीत राजू शेट्टी आणि महादेव जानकर यांचा समावेश करुन महायुती भक्कम करायचा प्रयत्न झाला. महायुतीची वाटचाल आता सुरळीत सुरू असतानाच गडकरी राज भेटीची सगळ्यांत तीव्र प्रतिक्रिया अर्थातच शिवसेनेकडून आली. शिवसेना -रामदास आठवले आणि राज ठाकरे यांच्यात काही दिवसांपुर्वीच जाहीर वाद झाला होता. त्यानंतर त्यांनीही जाहीरपणे मनसेच्या महायुती प्रवेशाला विरोध केला होता. गडकरींच्या नव्या ऑफरमुळे तेही अस्वस्थ आहेत. राज्यातल्या आघाडी सरकारविरोधात संतापाचं वातावरण आहे. आयबीएन नेटवर्कच्या सर्व्हेमधूनही महायुतीला सर्वाधिक जागा मिळतील, असा अंदाज व्यक्त केलाय. महायुतीची चांगली स्थिती असताना आणि मनसेची स्थिती बिकट गडकरींनी हा घाट का घातला, असा प्रश्न महायुतीतले नेते विचारत आहे.
First published:

Tags: BJP, MNS, Nitin gadkari, Raj and gadkari, Raj thakare news, Raj thakarey, गडकरी, नितीन गडकरी, बैठक, राज ठाकरे

पुढील बातम्या