08 मार्च : राज्याला पुन्हा एकदा गारांसह जोरदार पावसाने झोडपून काढले. मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्राला पावसानं पुन्हा झोडपलंय. बीड जिल्ह्यातल्या माझलगावमध्ये गेवराईला गारा आणि पावसाचा तडाखा बसलाय. गारा आणि पावसामुळे गहू, हरभरा, कापूस, भाजीपाल्याचं प्रचंड नुकसान झालंय.
पावसाच्या तडाख्यात उरलीसुरली पिकंही हातची गेली आहेत. गेले सहा दिवस वर्धा जिल्ह्यात वादळी वार्यासह गारपीट यामुळे गहू , चणा, भाजीपाला यांच प्रचंड नुकसान झालंय. याशिवाय संत्रा , केळी अशा फळबागाही मोठ्या प्रमाणावर तडाखा बसलाय.
एकट्या वर्धा जिल्ह्यात 35 हजार एकर शेतीचं नुकसान झालंय. दिडेशहून अधिक घरांची पडझड झालीय. आणि अनेक घरांचं नुकसान झालंय. आतापर्यंत या अस्मानी संकटामुळे 10 जणांचा बळी गेलाय तर हजारो जनावरांचा मृत्यू झालाय.
विदर्भात टेनिस बॉलच्या आकाराच्या गारा
विदर्भातील आज पुन्हा बुलडाणा, वाशीम आणि अकोला या जिल्ह्यात वादळी वार्यांसह मुसळधार पाऊस आणिटेनिस बॉलच्या आकाराच्या गाराही पडल्या त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. या तीनही जिल्ह्यात गहू, हरभरा, ज्वारी, कांदा आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वाशीम जिल्ह्यातील रिसोड, बुलडाण्यातील लोणार, धाड आणि चिखली तर अकोल्यातील तेल्हारा येथे गारपीटीमुळे मोठे नुकसान झाले. तासाभरात झालेल्या पावसामुळे शेडनेट आणि फळबागांचे नुकसान झाले.
नांदेडला अवकाळी पावसाचा तडाखा
नांदेड जिल्ह्यात आज दुपारी ठिकठिकाणी पुन्हा जोरदार पाऊस झाला. नांदेड शहरासह लोहा, कंधार, मुखेड, नायगाव, सोनखेड या तालुक्यांना पावसानं पुन्हा तडाखा दिलाय. सकाळपासून आभाळ मोकळा होता. पण दुपारी साडेचारच्या सुमारास अचानक पाऊस सुरू झाला. सकाळपर्यंत कमीअधिक प्रमाणात जिल्ह्यात ठिकठिकाणी पाऊस सुरूच होता. अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचं काम सुरू असताना या पावसाने त्या कामात अडथळा आणला. या पावसामुहे नुकसानीचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
नाशिकमध्ये द्राक्षाचे मळे उद्धवस्त
नाशिक जिल्ह्यातल्या मालेगाव, येवला आणि लासलगाव ह्या पट्ट्यात तर अहमदनगरच्या श्रीरामपूरमध्ये जोरदार गारपीट झाली. गेल्या तीन दिवसात झालेल्या गारपीटीच्या तुलनेत आज झालेल्या गारपिटीत गारांचा आकार मोठा होता. त्यामुळे द्राक्षांच्या बागात उद्धवस्त झाल्या आहे. तर गहू, हरभरा आणि कांदा या पिकांचं मोठ नुकसान झालं.
सोलापुरात 352 कोटींचे नुकसान
विदर्भ मराठवाडाच नाही तर गारपिटीनं सोलापुरातही मोठ्या प्रमाणावर नुकसान झालंय. द्राक्ष, डाळिंब या फळबागांसोबतच ज्वारी, गहू, हरभरा , मका, अशा पिकांचं पुर्णपणे नुकसान झालंय. प्रशासनाच्या प्राथमिक अंदाजानुसार एकट्या सोलापुरात आतापर्यंत 32 हजार हेक्टरवरच्या 352 कोटी 14 लाख रुपये किंमतीच्या शेती पिकाचं पूर्णपणे नुकसान झालंय. वादळी वार्यात आतापर्यंत जिल्ह्यात तिघांचा बळी गेलाय,आताप्रर्यंत पंचनाम्यासाठी 300 पथकं पूर्ण सोलापूर जिल्ह्यात तैनात करण्यात आली असून युद्धपातळीवर पंचनाम्याचे सोपस्कार पार पाडले जात आहेत, त्यामुळे अंतिम आकडेवारी समोर आलेली नाही. पंचनामा केल्यावर अहवाल शासनाकडे पाठवला जाईल आणि शासनाकडून मदत मिळेल असं सरकारी उत्तर प्रशासनाकडून सांगितलं जातय त्यामुळे शेतकरी चिंतेत आहे
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maharashtra rain, Marathwada rain, Nanded rain, Vidharbha rain