07 जुलै : मोदी सरकारच्या पहिल्या अधिवेशनाची अपेक्षेप्रमाणे वादळी सुरुवात झाली आहे. महागाई आणि रेल्वे भाडेवाढ या मुद्यांवरून विरोधी पक्षांनी सरकारला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्यानंतर प्रचंड गदारोळात लोकसभेच्या अध्यक्ष सुमित्रा महाजन यांना लोकसभेचं कामकाज दोन वेळा तहकूब करावं लागलं.
तर राज्यसभेत अर्थमंत्री अरूण जेटली यांनी महागाईच्या मुद्यावरून सरकार चर्चेसाठी तयार आहे, असं सांगितलं. त्यामुळे राज्यसभेत यावर चर्चा सुरू झाली. महागाई कमी होईल या अपेक्षेनं भाजपला मतदान केलेल्या सामान्य नागरिकांचा भाजपनं विश्वासघात केला आहे, अशी टाकी काँग्रेस खासदार गुलाम नबी आझाद यांनी केली. तर गरिबांना दिलेली आश्वासनं सरकारनं पूर्ण करायलाच हवीत, असं बसपाच्या अध्यक्ष मायावती यांनी म्हटलं आहे. रेल्वे भाडेवाढीवरून तृणमूलच्या खासदारांनी सरकारला धारेवर धरलं.
दरम्यान, बजेट अधिवेशनाच्या पार्श्वभूमीर काँग्रेसकडून देशभर ठिकठिकाणी महागाईविरोधात आंदोलन करण्यात येतं आहे. दिल्लीत जंतर-मंतरवर दिल्ली काँग्रेसतर्फे आंदोलन करण्यात आलं. यावेळी आंदोलन करणार्या कार्यकर्त्यांना अडवण्यासाठी पोलिसांना बॅरिकेड्स लावावे लागले. दिल्लीजवळच्या फरिदाबादमध्येही काँग्रेसनं महागाई विरोधात काँग्रेसनं आंदोलन केलं. तर राज्यात कोल्हापूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी वाहन ढकल आंदोलन केलं. शहरातल्या काँग्रेस कमिटीच्या कार्यालयापासून बंद वाहनांची एक रॅली काढून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आपापली वाहन ढकलंत नेऊन केंद्र सरकारचा निषेध केला. सरकारनं इंधनांचे वाढवलेले दर कमी करावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली. या आंदोलनात काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.