मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

मुख्यमंत्री बिझी, सर्वपक्षीय खासदारांसोबतची बैठक घेतलीच नाही !

मुख्यमंत्री बिझी, सर्वपक्षीय खासदारांसोबतची बैठक घेतलीच नाही !

cm_devendra_phadanvis4मुंबई - 22 फेब्रुवारी : अर्थसंकल्पीय अधिवेशनाआधी राज्यातल्या खासदारांची मुख्यमंत्र्यांसोबत होणारी बैठक यंदा झालीच नाही. त्याला कारण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं बिझी शेड्युल...अनेक छोट्या-मोठ्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार्‍या मुख्यमंत्र्यांना खासदारांसाठी मात्र वेळ नाही हेच यावरुन दिसून येतंय.

केंद्र सरकारकडे राज्याचे प्रश्न अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित असतात. त्याकरता, केंद्रीय अर्थसंकल्पाआधी, राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री राज्याच्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेतात. या बैठकीच्या माध्यमातून खासदारांनी राज्याचा आवाज संसदेत उठवावा अशी त्यामागची अपेक्षा असते. गेल्या चार - पाच वर्षांपासून महाराष्ट्र दुष्काळाच्या झळांनी होरपळतोय. अशा पार्श्वभूमीवर तर मुख्यमंत्र्यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक बोलावून, या परिस्थितीबाबत केंद्राकडे मागण्यांचा पाठपुरावा करण्यासाठी खासदारांना सांगणं अपेक्षित होतं. पंतप्रधानांना याची माहिती देऊन राज्याला अधिकाधिक मदत मिळवणं हा त्या बैठकीमागचा हेतू असायला हवा होता. पण, काय करणार, मुख्यमंत्री महोदयांना त्यांच्या बिझी शेड्युलमुळं बैठकीला वेळच मिळाला नाही. संसदीय प्रथा परंपरा हे सरकार मोडीत काढतंय असा आरोप माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे.

राज्यातल्या दुष्काळासोबतच बेळगावचा सीमाप्रश्न, प्रलंबित रेल्वे प्रश्न यासारखे विविध प्रश्न गेली काही वर्षे रखडलेली आहेत. त्यासाठीच राज्याचे प्रमुख म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्वपक्षीय खासदारांची बैठक घ्यायला हवी होती. मात्र मेक इन इंडियामध्ये बिझी असलेल्या मुख्यमंत्र्यांना यासाठी वेळच मिळाला नाही.

यापूर्वीच्या सगळ्याच मुख्यमंत्र्यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या आधी राज्यातल्या सर्वपक्षीय खासदारांची बैठक घेण्याची प्रथा पाळली आहे. मात्र, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्याला छेद दिला आहे. विशेष म्हणजे राज्यात युतीच्याच खासदारांचं संख्याबळ अधिक आहे. तरीही मुख्यमंत्री त्यांच्यासोबत राज्याच्या मागण्यांसंदर्भात बैठक घेत नाहीत, याचा अर्थ काय समजायचा? सत्ताधारी आणि विरोधकांच्या राजकारणात जनतेच्याच प्रश्नांचा विसर सत्ताधार्‍यांना पडलाय का, अशी सध्या चर्चा आहे. दरम्यान, मुख्यमंत्र्यांनी प्रथो मोडू नये, असं माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलंय.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Follow @ibnlokmattv


First published:

Tags: देवेंद्र फडणवीस, बैठक, मुख्यमंत्री