Home /News /news /

मरणाने केली सुटका, तरीही माणुसकीने छळले...

मरणाने केली सुटका, तरीही माणुसकीने छळले...

sangali_hospital01 नोव्हेंबर : 'इतकेच मला कळले होते...मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते...' ज्येष्ठ कविवर्य सुरेश भट यांच्या गझलेतील वास्तव सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये पाहण्यास मिळालं. बेवारस मृतदेहांना चक्क कचर्‍याच्या गाडीतून दफनभूमीत नेण्यात आलं पण हा किळसवाणा प्रकार इथंच थांबला नाही तर मृतदेहांच्या पायाला दोरी बांधून फरफडत नेऊन दफन करण्यात आलं. पुरोगामी महाराष्ट्राचे वाभाडे काढणारी ही घटना उजेडात आलीये.

सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये सांगली सिव्हिल हॉस्पिटल आणि महापालिकेच्या असंवेदनशील कारभाराचा वेदनादायक नमुना पाहायला मिळाला. पोस्टमॉर्टेम केलेले दोन मृतदेह चक्क कचर्‍याचा गाडीतून दफनभूमीकडे नेण्यात आले. एवढ्यावरच त्यांची अवहेलना थांबली नाही तर मृतांच्या पायाला दोरी बांधून मृतदेह फरफटत नेण्यात आले आणि त्यांचं दफन करण्यात आलं. त्यानंतर एकाच खड्‌ड्यात या दोन्ही मृतदेहांचं दफन करण्यात आलं. ऍम्ब्युलन्स असूनही महापालिकेच्या आरोग्य कर्मचार्‍यांनी हा किळसवाणा आणि असंवेदनशील प्रकार केला. ज्या खड्‌ड्यात हे मृतदेह दफन करण्यात आले, तो खड्डाही पुरेसा खोल नाही. मृतदेह तीन फुटाच्या छोट्याशा खड्यात हे चुकीच्या पद्धतीने दफन केले आहेत. एकाच खड्यात दोन मृतदेह दफन केल्याने आणि खड्डा छोटा असल्याने पुन्हा खडा मोकाट कुत्री उकरू शकतात आणि मृत देहाची लचके तोडू शकतात. याच ठिकाणी या आधी मृतदेह दफन केलेला खड्डा उकरून मोकाट कुत्री मृतदेहाची लचके तोडण्याच्या घटना समोर आल्या होत्या. या घटनेचा सर्व स्तरातून संताप व्यक्त होतं आहे.

अखेर 5 जणांची समिती स्थापन

आयबीएन लोकमतने हा प्रकार उघड केल्यानंतर आता बेवारस मृतदेह हेळसांड प्रकरणी 5 जणांची समिती स्थापन करण्यात आली आहे. सांगली-मिरज-कुपवाड महापालिकेचे आयुक्त अजिझ कारचे यांनी समिती नेमलीय. अहवालानंतर दोषींवर कडक कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आलंय. या समितीमध्ये सहाय्यक आयुक्त, उपायुक्त, वैद्यकीय आरोग्य अधिकारी, मुख्य स्वच्छता निरीक्षक आणि सहाय्यक आरोग्य अधिकारी यांचा समावेश आहे. +++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

Follow @ibnlokmattv

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Sangali, मिरज, सांगली

पुढील बातम्या