21 ऑक्टोबर : पाकिस्तानविरोधी भूमिकेवरून सध्या आक्रमक झालेल्या शिवसेनेने आता बॉलीवूड कलाकार फवाद खान आणि माहिरा खान यांना लक्ष्य करण्याचे ठरवलं आहे. या दोघांनाही त्यांच्या एकाही चित्रपटाचे महाराष्ट्रात प्रमोशन करू देणार नाही, असा पवित्रा शिवसेनेने घेतला आहे.
'फवाद खान आणि महिरा खान यांना विरोध करताना ते काम करत असलेला चित्रपट कोणाचा आहे, याचा विचार आम्ही करणार नाही. करण जोहर, फरहान अख्तर, शाहरूख खान हे देशाचे जबाबदार नागरिक आहेत. त्यामुळे त्यांनी पाकिस्तानी कलाकारांना त्यांच्या चित्रपटात घेऊ नये', असं शिवसेनेकडून सांगण्यात आलं आहे. त्यामुळे येत्या काही दिवसांत सेनेच्या पाकिस्तानविरोधी भूमिकेची झळ बॉलीवूडलाही बसण्याची शक्यता आहे.
2014 मध्ये खुबसूरत या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलेला फवाद खान हा कपूर ऍण्ड सन्स आणि ए दिल है मुश्किल या चित्रपटांतूनही झळकणार आहे. तर, दुसरीकडे माहिरा खान शाहरूख खानच्या 'रईस' या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करणार आहे. मात्र, शिवसेनेने फवाद खान आणि माहिरा काम करत असलेलल्या चित्रपटांच्या दिग्दर्शकांना पत्र पाठवून तंबी दिली आहे. आम्ही कोणताही पाकिस्तानी कलाकार, खेळाडू किंवा कलाकाराला महाराष्ट्रात पाऊल ठेवू देणार नाही, असं शिवसेनेच्या चित्रपट सेनेचे अध्यक्ष राहुल बर्दापूरकर यांनी सांगितलं आहे.
यापूर्वी शिवसेनेच्या विरोधामुळे प्रसिद्ध गझल गायक गुलाम अली यांचे मुंबई आणि पुण्यातील कार्यक्रम रद्द करण्यात आलं होतं. त्यानंतर पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री खुर्शीद कसुरी यांच्या पुस्तक प्रकाशनाविरोधात सुधींद्र कुलकर्णी यांच्यावर केलेली 'शाईफेक' चांगलीच गाजली होती. तर नुकतीच पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे अध्यक्ष शहरयार खान यांची बीसीसीआय कार्यालयातील नियोजित बैठक उधळून लावली होती.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.