मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /बलात्कार प्रकरणात अल्पवयीन आरोपींची संख्या जास्त !

बलात्कार प्रकरणात अल्पवयीन आरोपींची संख्या जास्त !

  16 सप्टेंबर : महिलांवरच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये गेल्या काही दिवसांत सातत्यानं वाढ झालेली दिसतेय. मुंबई शहर आणि परिसरातल्या अगदी गेल्या दोन-तीन दिवसांतल्या घटना पाहिल्या तरी भीती वाटावी अशी स्थिती आहे. लहान आणि अल्पवयीन मुली मोठ्या प्रमाणात अत्याचारांना बळी पडताहेत, आणि आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचं वाढतं प्रमाण ही चिंताजनक बाब आहे.

  नागपूरमध्ये 13 सप्टेंबरला 15 वर्षांच्या दोन मुलांनी एका सात वर्षांच्या मुलीवर सामूहिक बलात्कार केला. या मुलांनी या लहानगीच्या घरात घुसून तिच्यावर अत्याचार केले. आधी घाबरून या मुलीनं आईला काही सांगितलं नाही. पण दोन दिवसांनी असह्य वेदना होऊ लागल्यानंतर तिनं आईला घडला प्रकार सांगितला. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही मुलांना ताब्यात घेतलंय.

  गेल्या दोन दिवसांत लहान मुलींवरच्या अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात समोर आल्यात. ठाणे जिल्ह्यातल्या बदलापूरमध्ये एका चार वर्षांच्या मुलीवर खासगी स्कूल बसच्या कर्मचार्‍यानं बलात्कार केला. पुणे जिल्ह्यातल्या शिरूर म्हाळुंगीमध्ये 69 वर्षांच्या नराधमानं पाच वर्षांच्या लहानगीवर बलात्कार केला. ठाण्यात एकतर्फी प्रेमाला प्रतिसाद दिला नाही म्हणून, एका 17 वर्षांच्या युवकाने अल्पवयीन तरुणीवर चाकूचे वार केले. आणि कांदिवलीमध्ये बहिणीची छेड काढताना अडवलं म्हणून काही अल्पवयीन मुलांनी एका युवकाला मारहाण केली.

  या घटना बघितल्या तर आरोपींमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभाग लक्षणीय आहे. नागपूरच्या मुलांना ब्लू फिल्म बघण्याचा नाद होता असं पोलिसांच्या तपासात समोर आलंय. मुलींच्या सुरक्षेसाठी कठोर पावलं उचलण्याबरोबरच वयात येणार्‍या मुलांचं प्रबोधन करणंही आवश्यक ठरतंय.

  First published:

  Tags: Mumbai, Nagpur, Photo, Photography, Rape, मुंबई, मुंबई गँगरेप, सामूहिक बलात्कार