मराठी बातम्या /बातम्या /बातम्या / फिल्म रिव्ह्यु : वास्तवाची जाण करून देणारा 'सैराट'

फिल्म रिव्ह्यु : वास्तवाची जाण करून देणारा 'सैराट'

    अमोल परचुरे, समीक्षक

    'सैराट'चा आशय काय आहे त्यावर बोलणार आहेच, पण हा 'सैराट' मांडणीच्या, सादरीकरणाच्या दृष्टीने कसा महत्त्वाचा आहे, ते समजून घेणं गरजेचं आहे. चित्रभाषेच्या बाबतीत बोलायचं तर गेल्याकाही वर्षात नवीन प्रयोग जरुर झाले. किल्ला असेल, ख्वाडा असेल, कोर्ट असेल किंवा अगदी नागराजचाच फँड्री असेल..नवं काहीतरी सांगणारे हे सिनेमे खरंच जनसामान्यांपर्यंत पोचले का याचं उत्तर नाही असंच आहे. या कलाकृती, सिनेमाचे जे खरे आस्वादक आहेत त्यांनाच भिडले असंच चित्र दिसून येतं.nagraj-manjule

    ही कोंडी फोडण्याचं काम सैराटने केलंय. ज्याला कमर्शिअल सिनेमा म्हटलं जातं, त्याबाबतीत आपला मराठी सिनेमा कुठे आहे? अगदी हॉलिवूड असेल किंवा मल्याळम सिनेमा असेल, त्यांनी काळानुरुप जे बदल केले ते आपल्या मराठी सिनेमात क्वचितच बघायला मिळतं. लोकांना हेच आवडतं असं कारण देत त्याचत्याच लोकप्रिय कल्पना कुरवाळत बसलो. या परिस्थितीत कुठेतरी सुवर्णमध्य काढण्याचा प्रयत्न नागराजने केलेला आहे. शोमॅन म्हणजे काय ते त्याने दाखवून दिलंय. राज कपूरच्या मनातली भव्यता, रामगोपाल वर्माची प्रयोगशीलता आणि अनुराग कश्यप घेतो तसं स्वातंत्र्य याचं मिश्रण सैराटमध्ये दिसलेलं आहे, असं म्हणता येईल.

    काय आहे स्टोरी ?

    sairat3आपला सिनेमा कसा वेगळा आहे, असं सगळेच सांगतात, पण नागराजची ही सैराट प्रेमकथा वेगळ्या वाटेवर जाणारी आहे. कथा काय आहे, याचा तुम्हाला ट्रेलर बघून अंदाज आलेला असला तरी त्यापेक्षा बरंच काही सिनेमात आहे, कदाचित त्यामुळेच सिनेमा तीन तासांचा आहे. नागराजचा हा दुसराच सिनेमा असल्यामुळे पहिल्या फँड्रीशी तुलना होईलच, पण तशी तुलना करणं बरोबर नाहीच...मला जे सांगायचंय, जसं सांगायचंय तसंच मी सांगणार यावर ठाम राहत नागराजने सिनेमा केलाय हे महत्त्वाचं आहे. गँग्ज ऑफ वासेपूर बघताना जे जाणवलं तशीच सफाईदार मांडणी सैराटमध्ये दिसली. तसं तर मुगल-ए-आझम पासून एक दुजे के लिएपर्यंत आणि कयामत से कयामत तक पासून इशकजादें पर्यंत अशा बर्‍याच प्रेमकहाण्या आपण बघितल्या आहेतच, मग सैराटमध्ये वेगळं काय आहे? असाही प्रश्न तुमच्या मनात असेल.

    ऊसामुळे आलेली संपन्नता, संपन्नतेतून आलेला सत्तेचा माज, प्रत्यक्षात तालुक्यापर्यंत मर्यादित असलेली सत्ता, शैक्षणिक विद्वत्तेलाही झुकायला लावणारी सत्ता, स्त्री-पुरुष समानतेची नुसतीच पोकळ भाषा, दिशाहीन भरकटलेली सत्ताधार्‍यांची पुढची पिढी, जातपंचायतीचा बागुलबुवा असं खूप या सैराटमध्ये ठासून भरलेलं आहे. प्रेमकहाणी फुलवण्यामध्ये नागराजने बराच वेळ घेतलाय, पण एकदा का या प्रेमकहाणीला गोंजारुन झालं की तो प्रेक्षकांना धाडकन वास्तवात आणतो.

    नवीन काय ?

    नागराजने प्रेक्षकांबरोबर थोडा खेळही केलाय. सिनेमे बघून बघून प्रेक्षकांनासुध्दा काही भाग सवयीचे झालेले असतात. इंटरव्हल कधी होणार, सिनेमा कुठे संपणार याबद्दलचे प्रेक्षकांचे सगळे अंदाज नागराज खोटे ठरवतो. सिनेमाची लांबी तीन तासांची आहे, सिनेमा बघताना प्रेक्षक म्हणून आपली करमणूक आणि दमणूक दोन्ही होते, कारण एवढावेळ स्वस्थ बसणं याची सवय गेलीये, सिेनमा मोठा असला तरी त्यातला अमुक एक भाग एडिट करता आला असता असं आपल्याला वाटत राहतं आणि तोच भाग कसा महत्त्वाचा होता असंही लगेच वाटतं, हे जे आपल्या मनात बराच काळ सुरु राहतं, हे रेंगाळणं हेच नागराजचं यश म्हणायला पाहिजे... या सैराट कथेमध्ये अजय-अतुलची गाणी खूपच चपखल बसलेली आहेतच...ठेका धरायला लावणारं, त्या मातीतलं हे संगीत सैराटला वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवतं. इंटरव्हलआधी अजय-अतुलनी दिलेलं पार्श्वसंगीतही लाजवाबच, पण त्याचबरोबर इंटरव्हलनंतर बदललेल्या कथेसाठी पार्श्वसंगीताचा वेगळा विचार व्हायला हवा होता असं वाटत राहतं.

    परफॉर्मन्सsairat34523

    आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरु हे या सिनेमाची जान आहेत आणि त्यांनीही जीव ओतून काम केलेलं आहे. अभिनयाची पार्श्वभूमी नसताना त्यांच्याकडून सर्व प्रकारचा अभिनय करुन घेणं ही दिग्दर्शकाची कमाल आणि त्यांनीही समजून, मेहनत घेऊन जी अदाकारी केली आहे तीसुद्धा कमालच आहे. त्यांच्याबरोबरच बाकी सर्व पात्रंही अगदी खरीखुरी वाटावीत अशीच आहेत.परशाच्या मित्रांनीही चांगलीच धमाल केलीये. एकूणच लव्ह स्टोरीत सैराट ही एक वेगळी कलाकृती आहे.

    रेटिंग 100 पैकी 75


    बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

    Follow @ibnlokmattv


    First published:
    top videos

      Tags: Sairat