22 नोव्हेंबर : दिल्लीमध्ये भाजपच्या संसदीय समितीच्या बैठकीत नोटाबंदीच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी भावूक झाले. 'पाचशे आणि एक हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय सरकारनं देशातील गरिबांच्या हितासाठी घेतला आहे. त्याला 'सर्जिकल स्ट्राइक' म्हणू नका,' असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं.
‘नोटाबंदीमुळे काळ्या पैशाला चाप बसणार आहे. मात्र काळ्या पैशाविरोधातील नोटाबंदीच्या कारवाईला सर्जिकल स्ट्राइक म्हणू नका’, असं आवाहन यावेळी मोदींनी केलं. या बैठकीला भाजपचे खासदार उपस्थित होते. भाजपच्या अनेक खासदारांकडून नोटाबंदीच्या कारवाईचा उल्लेख सर्जिकल स्ट्राइक म्हणून केला जात होता. त्यांना मोदींनी हे आवाहन केलं आहे.
'नोटाबंदीवरून विरोधक चुकीची माहिती पसरवत आहेत. प्रत्यक्षात नोटाबंदी ही आर्थिक सुधारणा आहे. या सुधारणेचे काय-काय फायदे आहेत, याची योग्य माहिती लोकांपर्यंत न्या,' असं मोदी म्हणाले.
दरम्यान, नोटाबंदीवरून सरकारनं घेतलेल्या निर्णयाला पाठिंबा देणारा ठराव या बैठकीत संमत करण्यात आला. अर्थमंत्री अरुण जेटली यांनी बैठकीतील ठरावाची आणि पंतप्रधान मोदी यांच्या भाषणाची माहिती पत्रकारांना दिली. 'नोटाबंदीचा निर्णय हा खूपच मोठा निर्णय आहे. असा निर्णय घेण्यासाठी धाडस लागते. मोदींच्या या निर्णयामुळं देश आर्थिक अराजकतेतून आर्थिक सुव्यवस्थेच्या युगात आला आहे,' असा दावा जेटली यांनी केला.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा Follow @ibnlokmattv
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parliament session, Winter session