11 फेब्रुवारी : पुण्यातील मनसेच्या फायरब्रँड नगरसेविका रुपाली पाटील ठोंबरे यांना निकालाआधीच एक गोड 'निकाल' लागला. ऐन प्रचाराच्या धामधुमीत त्यांना मुलगा झाला. एकीकडे मुलगा झाल्याचा आनंद आणि दुसरीकडे 10 दिवसांवर येऊन ठेपलेली पालिका निवडणूक...पण मुलाच्या जन्माच्या पेढयासोबत निवडणूक विजयाचा पेढाही आपणच खाणार असा विश्वास रुपाली यांना आहे.
शुक्रवारी 10 फेब्रुवारीला संध्याकाळी शनिवार-सदाशिवपेठेत अर्थात प्रभाग 15मध्ये पदयात्रेत असतानाच रुपाली यांना प्रसववेदना सुरू झाल्या. पदयात्रा आटपून त्या घरी आल्या. रात्री उशिरा शिवजीनगर भागातील क्लाऊड नाईन या खाजगी रुग्णालयात भर्ती झाल्या आणि शनिवारी सकाळी त्यांनी मुलाला जन्म दिला. हे सगळं अनपेक्षित होतं कारण 5 मार्च ही प्रसूतीची तारीख त्यांना देण्यात आली होती. आणि प्रचाराच्या निमित्ताने पदयात्रेत झालेलं चालणं त्यांना फायद्याचं ठरलं असं त्यांना वाटतंय. कारण त्यांची डिलिव्हरी नॉर्मल झाली. पक्षानेही गरोदर असूनही तिकीट दिलं याबद्दल त्यांनी पक्षाचे आभार मानले.
विशेष म्हणजे अवघ्या 3 दिवसांची विश्रांती घेऊन त्या पुन्हा निवडणुकीच्या रणधुमाळीत उतरणार आहेत. खेड्यापाड्यातील बायका,शेतकरी,शेतमजूर महिला जर काम करता प्रसूत होत असतील. स्वतः ची नाळ कापून बाळाला जन्म देऊन पुन्हा कामाला सुरुवात करत असतील तर शहरातील महिलांनी सर्व अद्ययावत सुविधा असताना कुरकुर का करावी असा सवालच त्यांनी उपस्थिती केला. यामुळे रुपाली यांचं चिन्ह रेल्वे इंजिनाची प्रतिकृती असलेल्या वाहनात त्यांच्या सोबत लहानगं बाळ दिसलं तर आश्चर्य वाटू देऊ नका.
अर्थात गेल्या वेळी राज ठाकरे यांच्या सुप्त लाटेत पुण्यात मनसेचे तब्बल 29 नगरसेवक निवडून आले होते. मात्र यंदा तशी स्थिती नाही. त्यामुळे रुपाली यांचा आनंद द्विगुणित होतो का मुलाच्या जन्माच्या पेढयासोबत निवडणूक विजयाचा पेढाही त्या वाटतात का ? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. तूर्त मात्र त्यांना पहिला विजय मिळाला आहे आणि त्या तो साजरा करत आहेत त्याबद्दल त्यांना शुभेच्छा.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pune, Pune election, नगरसेविका, पुणे, मनसे