06 सप्टेंबर : संपूर्ण देशभरात गोकुळाष्टमीची धूम आहे. ठिकठिकाणी कृष्ण जन्मोत्सव मोठ्या उत्सवात साजरा करण्यात आला. मथुरा म्हणजे कृष्णाचं जन्मस्थान, त्यामुळे मथुरेत श्रीकृष्णाच्या जन्माचा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येतो. भाविकांनीही या उत्साहात सहभागी होण्यासाठी मथुरेत मोठी गर्दी केली. भारतातल्या कानाकोपर्यातून भक्त तर आलेच होते पण मथुरेतल्या गोकुळाष्टमीचे साक्षीदार होण्यासाठी परदेशातूनही कृष्णभक्तांनी गर्दी केली होती.
रोहिणी नक्षत्रात जन्माष्टमी साजरी करण्यात येते. विशेष म्हणजे याच नक्षत्रात श्रीकृष्णाचा जन्म झाला. काही दशकानंतर हा अनोखा योग जुळून आला. मथुरेबरोबच देशभरात आणि राज्यातही श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उत्साह पाहायला मिळत आहे.
मथुरेतल्या कृष्णमंदिरात रात्री दहावाजेपासूनच कार्यक्रमांना सुरुवात झाली. श्रीकृष्णाच्या जन्मस्थानावर शनिवारी रात्री अकरा वाजेपासूनच महाभिषेक सुरू झाला. 11 वाजून 59 मिनिटांनी कृष्णाचा दर्शन बंद करण्यात आलं आणि एक मिनिटांनंतर म्हणजेच बरोबर 12 वाजता कृष्णाचं दर्शन होताच ढोल-ताशांच्या गजरात महाआरती करण्यात आली. भक्तांनीही नाचून आनंद व्यक्त केला. यानंतर केसर आणि सुगंधित द्रव्यांनी युक्त बालगोपाळाची मूर्ती आणण्यात आली. या मूर्तीवर महाभिषेक करण्यात आला. रात्री 12.15 वाजेपर्यंत अभिषेक करण्यात आला. रात्री 12 वाजून 50 मिनिटांनी श्रृंगार आरती करण्यात आली. रात्री दीड वाजेपर्यंत भक्तांसाठी दर्शन खुलं करण्यात आलं. वृंदावनात आणि नंदगावातही जन्माष्टमी साजरी करण्यात आली.
तर मुंबईतही ठिकठिकाणी कृष्ण जन्माचा हा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मुंबईच्या इस्कॉन मंदिरात पारंपरिक पद्धतीनं श्रीकृष्णाची पूजा करण्यात आली. श्रीकृष्णाच्या जयघोषांनी यावेळी संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमला. कृष्णजन्माष्टमीमुळं मंदिरालाही सुंदर पद्धतीनं सजवण्यात आलं आणि भाविकांच्या दर्शनासाठीही योग्य काळजी मंदिर प्रशासनानं घेतली.
++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टि्वटर अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Shri krishna janmashtami