21 ऑगस्ट : डॉ नरेंद्र दाभोलकर यांचा खुनाच्या घटनेला 24 तास उलटले मात्र अजूनही पोलिसांच्या हाती काहीही लागलं नसून आरोपी मोकाटच आहे. मंगळवारी सकाळी दाभोलकर यांचा गोळ्या झाडून खून करण्यात आला. पोलिसांनी तपासाला ताबडतोब सुरुवात झाली. पुणे पोलिसांनी तपासासाठी आठ टिम्स बनवल्या आहे.
पण, मुंबई क्राईम ब्रांचही या खुनाचा स्वतंत्र तपास करणार आहे. त्यासाठी मुंबई क्राईम ब्रांचची विशेष टीम पुण्यात दाखलही झालीय. सुपारी देऊन खून करवण्यात आला असल्याचीही शक्यता व्यक्त होतेय.
तर या खुनामागे सनातन संस्थेचा हात आहे का, याचाही आम्ही तपास करत आहोत, असं पुणे पोलिसांनी म्हटलंय. तसा संशय वेगवेगळ्या राजकीय पक्षांच्या नेत्यांनीही व्यक्त केला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी संशयित हल्लेखोराचे रेखाचित्र जारी केले आहे.
डॉ नरेंद्र दाभोलकरांच्या खुनाचा तपास क्राईम ब्रांचने सुरू केलाय. घटना प्रत्यक्ष पाहणार्या एका साक्षीदारानं हल्लेखोरांच्या मोटारसायकलचा नंबर टिपून ठेवला आणि त्यांचं वर्णनही पोलिसांना सांगितलं. त्यावरूनच पोलिसांनी एका संशयिताचं रेखाचित्र जाहीर केलं. अजूनपर्यंत पोलिसांच्या हाती कोणताही ठोस पुरावा लागला नाहीये. पण सनातन संस्था आणि हिंदू जनजागृती समितीने दिलेल्या धमक्यांचा तपास करत आहोत, असं पोलीस आयुक्त राजीव सिंघल यांनी सांगितलंय.
गोव्यामध्ये मुख्यालय असलेल्या सनातन संस्थेने आणि त्यांच्याशी संबंधित असलेल्या हिंदू जनजागृती समितीने गेल्या अनेक दिवसांपासून दाभोलकरांविरोधात विखारी लिखाण केलं होतं. त्यांना अनेक वेळा जीवे मारण्याच्या धमक्या दिल्या होत्या. तसंच हिंदू जनजागृतीच्या वेबसाईटवर दाभोलकरांच्या छायाचित्रावर फुलीही मारण्यात आली आहे. त्यामुळे अनेक राजकीय पुढार्यांनी सनातनवर संशय व्यक्त केलाय. वेबसाईटच्या आधारावरून आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारावरून पुढचा तपास सुरू आहे. यासाठी पोलिसांच्या 8 तुकड्या तयार करण्यात आल्या आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.