मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

तस्कर असते, तर स्फोट घडवलाच नसता- पर्रिकर

तस्कर असते, तर स्फोट घडवलाच नसता- पर्रिकर

parrikar on pakistan terror boat

05 जानेवारी :  पोरबंदरजवळच्या अरबी समुद्रात तटरक्षकदलाच्या जवानांनी पाठलाग केल्यानंतर स्फोट झालेल्या बोटीमध्ये तस्कर असते, तर त्यांनी स्वत:हून स्फोट घडविलाच नसता, असं संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

नववर्षाच्या सुरवातीलाच पोरबंदरच्या समुद्रात एका संशयित बोटीत स्फोट झाला होता. त्यावेळी तटरक्षक दल आणि गुप्तचर यंत्रणांच्या सतर्कतेमुळे भारताने दहशतवादी हल्ला टाळला, असे सांगण्यात आले. पण, त्या बोटीशी आपला काही संबंध नसल्याचे पाकिस्ताननं म्हटलं होते आणि भारत पाकिस्तानची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला होता. यावरून भाजप आणि काँग्रेसमध्ये आरोप-प्रत्यारोपही झालेत. काँग्रेसनेही सरकारच्या या कारवाईवर प्रश्न उपस्थित केले होते.

या सर्व प्रकरणानंतर आज (सोमवारी) संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. 'या बोटीमध्ये तस्कर नाही तर अतिरेकी असावे, असं मला वाटतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे बोटीतल्या संशयितांनी आत्महत्या केली. ते तस्कर असते तर त्यांनी शरणागती पत्करली असती. आत्महत्या केली नसती', असं पर्रिकरांनी म्हटलं आहे. 'ही बोट ज्या मार्गानं भारतीय हद्दीत दाखल झाली, तो मार्गही नेहमीचा नव्हता. तस्कर असते तर ते नेहमीच्या मार्गाने आले असते. जेणेकरून त्यांना इतर बोटींमध्ये मिसळता आलं असतं. तसंच गुप्तचर विभागाच्या माहितीनुसार ही संशयित बोट 12 तासांहूनही जास्त काळ एकाच जागी उभी होती. तस्करी करणारी बोट अशा पद्धतीनं एकाच जागी कधीच उभी राहत नाही', असंही पर्रिकर यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, गुजरातजवळ अरबी समुद्रात पाकिस्तानी 'दहशतवादी बोटी'चा कट उधळण्यात आल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यात वाक्‌युुद्ध पेटले असतानाच, रविवारी पाकिस्तानच्या सागरी सुरक्षा दलाने भारतीय मच्छीमारांच्या दोन बोटींचे अपहरण करून जबरदस्तीने कराचीला नेल्याचा दावा करण्यात येत आहे. या बोटींमध्ये 12 भारतीय मच्छीमार असल्याचे सांगण्यात येत आहे.

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्‌र अकाऊंटसोबत

[if0] Follow @ibnlokmattv[sc0]

+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++

First published:

Tags: Pakistan, Terror attack, मनोहर पर्रिकर