16 ऑक्टोबर : राज्यभरातून विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या आज (रविवारी) ठाण्यात मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला आहे. ठाण्यातील तीन हात नाकापासून सुरू झालेला हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. तर चिपळूणमध्येही मराठा क्रांती मोर्चा काढण्यात आला असून या मोर्चासाठी दापोली, रत्नागिरी, राजापूरवरुन मराठा बांधव चिपळूणमध्ये दाखल झाली आहेत.
कोपर्डी प्रकरणातील आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, मराठा समाजाला आरक्षण द्यावे, एॅट्राॅसिटी कायदा रद्द करण्यात यावा, अशा विविध मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने मोर्चा काढण्यात येत आहे. मोर्चे शांततेत निघत असले तरी पोलिसांनी शहरात सर्वत्र कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. ठाण्यातील मोर्चासाठी बदलापूर, कल्याण, डोंबिवलीतील नागरिकही ठाण्यात दाखल झाली असून २० लाखांहून अधिक नागरिक या मोर्चामध्ये सहभागी होतील असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. या मोर्चात ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे सहभागी झाले आहेत.
ठाण्यातील मोर्चामुळे महामार्गावरील वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने शहरात सकाळी 8 ते दुपारी 4 या वेळेत हे वाहतूकीत बदल करण्यात आले आहे. तर मध्य आणि हार्बर रेल्वेवरील मेगाब्लॉक या मोर्चामुळे रद्द करण्यात आला आहे. तसंच या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेकडून 40 ज्यादा लोकलही धावणार आहेत.
दरम्यान, चिपळूणमध्येही मराठा क्रांती मूक मोर्चाला सुरुवात झाली असून चिपळूणमध्ये संपूर्ण वातावरण भगवामय झालं आहे. चिपळूणमधल्या पवन तलावाच्या ग्राउंडवर भव्य स्टेज आणि मोठ्या कमानी उभारण्यात आले आहेत. तसंच बॅनर्सही लावण्यात आले आहे. वाहतुकीला अडचण होऊ नये म्हणून अवजड वाहनांना मुंबई-गोवा महामार्गावर खेड ते संगमेश्वर या दरम्यान थांबवली जाणार आहे. तर काही वाहनं चिपळूण बायपासनं वळवली जाणार आहे. 60 अधिकारी आणि 600 पोलीस वाहतूक नियंत्रणासाठी तैनात करण्यात आला आहे. चिपळूणमधल्या मोर्चात विनायक राऊत, भास्कर जाधव आदी नेतेमंडळी सहभागी झाली आहेत. महिला आणि तरुणींनी मोर्चात लक्षणीय उपस्थिती लावली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Maratha reservation, Thane, चिपळूण, ठाणे, मराठा आरक्षण