Home /News /news /

झिम्बाब्वेची डॉलर कथा

झिम्बाब्वेची डॉलर कथा

Zimbabwe Trillion_3_CROP21 नोव्हेंबर: भारताच्या नोटबंदीच्या निर्णयाची जगभरात चर्चा सुरू आहे. नव्या नोटा छापल्या जातायत. नोटा छापण्याचे अधिकार सरकारकडे असतात. सरकार कितीही नोटा छापू शकतं पण मग जास्त नोटा छापून सरकार गरिबी का दूर करू शकत नाही, आपली कर्ज का फेडत नाही, असा प्रश्न विचारला जातो. पण आपण असं का करू शकत नाही. हे समजून घेण्यासाठी जगभरात एका देशाचं उदाहरण दिलं जातं.झिम्बाब्वेचं.

झिम्बाब्वेची ही 100 ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्सची नोट बघा.100 ट्रिलियन म्हणजे एकावर 14 शून्य ! झिम्बाब्वेला ही नोट छापावी लागली होती कारण त्यांच्या देशात त्यांच्याच डॉलरला काही किंमतच उरली नव्हती.

नोटा खूप आणि वस्तूंचं उत्पादन मात्र कमी. यामुळे एक वेळ अशी आली की 3 अंडी घ्यायची असतील तर 100 अब्ज झिम्बाब्वे डॉलर्स मोजावे लागले.  ब्रेड घेण्यासाठीही लोकांना ट्रॉलीमधून नोटा घेऊन जाव्या लागल्या.  एका चहाच्या कपाची किंमत काही ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्स झाली !

झिम्बाब्वेमध्ये 1990 सालानंतर खरंच असे व्यवहार सुरू होते.  खूप नोटा छापल्या की आपली गरिबी हटवता येईल, कर्ज फेडता येतील, असा आपला समज. झिम्बाब्वे सरकारने नेमकं हेच केलं आणि पण त्यामुळे हा देश दिवाळखोरीत गेला.

झिम्बाब्वेची ही कथा झाली...हुकूमशहा रॉबर्ट मुगाबे यांच्या एका निर्णयामुळे. झिम्बाब्वेमध्ये आधी ब्रिटिशांची वसाहत होती. या वसाहतवादाच्या गुलामगिरीतून मुक्त होण्यासाठी त्यांनी एक फतवा काढला. गोऱ्या लोकांच्या जमिनी स्थानिक लोकांच्या नावावर करण्याचा.

झिम्बाब्वेमधल्या कृष्णवर्णीय लोकांकडे जमिनी तर आल्या पण शेतीमध्ये सुधारणा झाल्या नाहीत. अन्नधान्याचं उत्पादन घटलं आणि किंमती वाढल्या. गरीब शेतकरी बँकांची कर्जही फेडू शकत नव्हते.

ही कर्ज फेडण्यासाठी आणि गरिबी दूर करण्यासाठी झिम्बाब्वे सरकारने जास्तीत जास्त नोटा छापायचं ठरवलं.  यातच 100 ट्रिलियन झिम्बाब्वे डॉलर्सची नोट त्यांना छापावी लागली पण तरीही त्याला काहीच किंमत राहिली नाही. एक वेळ तर अशी आली की 10 यूएस डॉलर्ससाठी 10 मिलियन झिम्बाब्वे डॉलर्स मोजावे लागले. आधीच्या चलनापेक्षा अब्जावधी पटीने चलनं छापली तरी ती कचऱ्यात टाकावी लागली.

पैशामुळेच आथिर्क दिवाळखोरी आली तर करायचं काय ?  झिम्बाब्वेने त्यांचं सगळं चलन रद्द केलं आणि यूएस डॉलर, युरो, भारतीय रुपये अशी चलनं वापरायला सुरुवात केली. 2015 मध्ये तर झिम्बाब्वेने त्यांच्या सगळ्या नोटा चलनातून पूर्णपणे रद्द करून टाकल्या. आता झिम्बाब्वेची अर्थव्यवस्था पूर्णपणे यूएस डॉलरवर आधारलेली आहे.

पैसे झाडाला येतात का ? असं आपण म्हणतो. पण खरंच झाडाला पैसे आले तर त्याला काही किंमतच उरणार नाही.. हा धडा झिम्बाब्वेच्या या डॉलरकथेतून घ्यायला हवा.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा
First published:

Tags: झिम्बाब्वे, डॉलर, नोटा

पुढील बातम्या