अद्वैत मेहता, पुणे
पुणे 27 मे : पावसाळ्यात साचलेलं पाणी वाहून जाण्यासाठी नाले असणं आवश्यक असतं. पण पुण्यात मात्र अनेक ठिकाणी बिल्डर आणि कंत्राटदारांनी या नाल्यांवर सर्रास अतिक्रमण केल्याचं उघड झालंय. यामुळे काही ठिकाणी नाले लहान झालेत तर काही ठिकाणी तर नाले गायबच झालेत. यामुळे लोकांना पावसाळ्यात याचा त्रास तर होतोच पण त्यांच्या जीवाला धोकाही निर्माण झालाय.
हेमकांत केणी आणि हेमा केणी...70 च्या वर वय असलेले हे ज्येष्ठ नागरिक बाणेर या पुण्याच्या वेगानं वाढणार्या उपनगरात गेली अनेक वर्ष राहताय. त्यांच्या बंगल्याच्या कंपाऊंड पलिकडे असलेला नैसर्गिक नाला अतिक्रमणांमुळे गायब झाल्याने त्यांच्या बंगल्याच्या आवारात पाणी येऊ लागलंय. महापालिकेकडे पत्रव्यवहार केला पण प्रशासनाने काहीच लक्ष न दिल्यानं केणी दांपत्यानं स्वत:च चर खणून पाण्याला वाट करून दिली. त्यामुळे ड्रेनेजचं सांडपाणी,कचरा पावसाच्या पाण्यासोबत येऊ लागल्यानं केणींनी खणलेले चर बुजवून टाकले. मात्र या सगळ्या प्रकाराबद्दल महापालिकेनं केणींनाच दोषी ठरवत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावली.
केणी जिथं राहतात त्या परिसरात फेरफटका मारल्यावर पूर्वी खूप रूंद असलेला हा नैसर्गिक नाला इमारतींमुळे कसा आक्रसत गेला, वळवला गेला आणि शेवटी गायब झाला याची झलकंच पहायला मिळते.
बाणेर भागात जे दिसलं ते पुण्याच्या पाषाण,औंध, कोथरूड, बालेवाडी या वेगानं वाढणार्या उपनगरातही सर्रास पाहयला मिळतंय. गेली 2 वर्षं पाऊसच कमी पडल्याने पुणेकरांना याचा त्रास झाला नाही हे खरंय मुसळधार पाऊस झाला तर काय परिस्थिती होईल याची कल्पना केलेलीच बरी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.