05 जुलै : आयबीएन लोकमतच्या बातमीचा इम्पॅक्ट...उत्पादन शुल्क मंत्री गणेश नाईक यांना मुंबई हायकोर्टानं दणका दिलाय. नवी मुंबईतलं ग्लास हाऊस तोडण्याचे आदेश हायकोर्टाने दिले आहेत. हे ग्लासहाऊस अनधिकृत आहे. त्यामुळे दोन आठवड्यात ते तोडा नाहीतर महापालिकेनं हे बांधकाम पाडावं असे आदेश हायकोर्टाने दिले आहे. तसंच अनधिकृतपणे बळकावलेली बावखळेश्वर मंदिराची जागा चार आठवड्यात परत घ्या, असे आदेश एमआयडीसीला देण्यात आले आहे. गरज पडली तर पालिका आणि एमआयडीसीला पोलीस संरक्षण देण्याचे आदेशही कोर्टाने दिले आहे. आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर यांनी यासंबंधीची याचिका दाखल केली होती.
काय आहे नाईकांचा घोटाळा ?
नवी मुंबईतील एमआयडीसीच्या जागेवर उभारलेलं बावखळेश्वर मंदिर... त्याच्या बाजूला असलेली सगळी नारळाची वाडी, तलाव आणि अलिशान विश्रामगृह ही सगळी प्रचंड मालमत्ता आहे नवी मुंबईचे सत्ताधीश आलेल्या गणेश नाईक यांच्या कुटुंबीयांची..पण नाईकांनी हे साम्राज्य ज्या जागेवर उभारलंय ती जागा आहे एमआयडीसीची..पण बळजबरीने अतिक्रमण करून जवळपास 200 कोटींची तब्बल 15 लाख स्क्वेअर फूट जागा नाईक कुटुंबीयांनी हडप केली. आणि आपलं साम्राज्य उभं केलं.
याविरोधात कारवाई करणं तर दूरच उलट अतिक्रमण करणार्या नाईकांना वाचवण्याचाच प्रयत्न एमआयडीसीकडून केला गेला. जुलै 2011 मध्ये एमआयडीसीने दिलेल्या माहितीनुसार हे अतिक्रमण गणेश नाईकांनी केल्याचं स्पष्टपणे सांगितलं. पण एका वर्षानंतर म्हणजे नोव्हेंबर 2012 ला या जागेवर शिवशंभो चॅरिटेबल ट्रस्टचे प्रवर्तक संतोष तांडेल यांनी हे अतिक्रमण केल्याचं लेखी कबूल केलंय. आता, हे संतोष तांडेल म्हणजे दुसरे तिसरे कुणी नसून गणेश नाईक यांचाच भाचा आहे. त्यानंतर, एमआयडीसीने फेब्रुवारी 2013 ला याच जागेवर बावखळेश्वर मंदिर ट्रस्टने अतिक्रमण केल्याचे लेखी कबूल केलंय. पण या बावखळेश्वर मंदिराचे ट्रस्टी आहेत संतोष तांडेल, नंदू म्हात्रे आणि सदानंद म्हात्रे. हे तिघंही गणेश नाईक यांचे भाचे आहेत. नाईक आणि त्यांच्या या नातलगांची दहशत एवढी आहे की, अतिक्रमणाच्या जागेची मोजणी करायला गेलेल्या अधिकार्यांनाच त्यांनी दमदाटी करून हूसकवून लावलंय. एमआयडीसीच्या अधिकार्यांनी नाईकांच्या दहशतीपुढची आपली हतबलता लेखी सांगितलंय.
मंदिराच्या आडून बेकायदेशीरपणे सरकारी जागेवर उभारलेलं हे साम्राज्य म्हणजे नवी मुंबईतल्या दादागिरीचा आणखी एक पुरावा. गणेश नाईक यांच्या या साम्राज्यावर हातोडा मारावा, या मागणीसाठी आरटीआय कार्यकर्ते संदीप ठाकूर मुंबई हायकोर्टात गेले. ही याचिका मुंबई हायकोर्टाने दाखल करुन घेत कॅबिनेट मंत्री गणेश नाईक यांना प्रतिज्ञापत्र सादर करायचे आदेश दिले आहेत. एकीकडे, सरकारच्या यंत्रणा सत्ताधारी मंत्र्यांचं अतिक्रमण हटवण्याऐवजी त्यांच्यापुढे लोटांगण घालत असताना आता हायकोर्टाच्या निकालाकडे न्यायासाठी डोळे लागले आहेत.
रेतीबंदर हटवून नाईकांचं आलिशान ग्लास हाऊस
तब्बल 60 हजार 277 स्क्वेअर फूट जागेवर उभं असलेलं हे आहे नाईक कुटुंबीयांचं आलिशान ग्लास हाऊस...बेलापूरच्या समुद्र किनार्यालगतच्या या जागेवर 10 वर्षांपूर्वी रेतीबंदर होतं. या रेतीबंदरावर नाईक कुटुंबियांनी हळूहळू कब्जा केला. आणि बघता बघता या जागेवर नाईकांचं अलिशान ग्लास हाऊस उभं राहिलं. कोट्यवधी रुपयांच्या जागेची मालकी आजही सिडकोकडे आहे. पण नाईकांनी बिनदिक्कतपणे जागा हडप करून इथं आपले इमले उभारल्याचा आरोप होतोय.
याविरोधात कारवाई करणं तर दूरच नाईक यांची एकहाती सत्ता असलेल्या नवी मुंबई महापालिकेनं तर आपल्याकडं या जागेची नोंदच नसल्याची धक्कादायक माहिती दिली. पण दप्तरी नोंद नसलेल्या जागेची 9 लाखांची करवसुली केल्याचं माहितीच्या अधिकारात पालिकेनं सांगितलंय. ज्या संतोष तांडेल यांच्याकडून पालिकेने जागेची करवसुली केली ते गणेश नाईक यांचे भाचे आहेत. प्रॉपर्टी भाच्याच्या नावावर असली तरी ग्लास हाऊसचा कारभार मात्र नाईक कुटुंबीयच बघतात. एवढंच नाही तर ग्लास हाऊसमध्ये मंत्री महोदय प्रशासकीय बैठका घेतात त्याचा हा कागदोपत्री पुरावा.
नाईक कुटुंबीयांनी ही जागा अतिक्रमण करून अक्षरश: हडप केली. पण याबद्दल कोणतीही सरकारी यंत्रणा ब्र काढायला तयार नाही. सगळी यंत्रणा दावणीला बांधून कोट्यवधींची जागा डोळ्यादेखत हडप करणार्या नाईकांविरोधात कारवाईचं धाडस आजपर्यंत कोणीही दाखवलेलं नाही. पण ग्लास हाऊसचं हे प्रकरण आता मुंबई हायकोर्टात गेल्यानं नाईकांना याची उत्तर द्यावं लागणार आहे.
नवी मुंबईतला दादा घोटाळा
ठिकाण - बेलापूर (रेती बंदर)
अतिक्रमणाची जागा- 60, 277 स्क्वेअर फूट
जागेची किंमत - साधारण 80 कोटी
जागेची मालकी - सिडको
ग्लास हाऊसची मालकी- संतोष तांडेल (नाईक यांचा भाचा)
ग्लास हाऊसचा आरसा
जागेची नोंद नसल्याची पालिकेची माहिती
जागेची पालिकेनं केली 9 लाखांची करवसुली
संतोष तांडेल यांच्याकडून केली वसुली
संतोष तांडेल गणेश नाईक यांचे भाचे
ग्लास हाऊसमध्ये गणेश नाईकांच्या प्रशासकीय बैठका
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: गणेश नाईक