मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /

खडसेंचं दबावतंत्र, 14 नगरसेवकांसह 4 आमदार राजीनाम्याच्या तयारीत?

खडसेंचं दबावतंत्र, 14 नगरसेवकांसह 4 आमदार राजीनाम्याच्या तयारीत?

01 जून :  विविध आरोपांच्या फेर्‍यात सापडलेले एकनाथ खडसे सध्या पक्षात एकाकी पडल्याचं चित्र आहे. मात्र राजकीय आखाड्याचा कसलेले पैलवान असलेले खडसेही आपल्या पद्धतीनं पक्षावर दबावतंत्राचा अवलंब करत आहेत.

442802-424342-khadse

एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी रस्त्यावर उतरून प्रत्युत्तराची तयारी सुरू केली आहे. कॅबिनेट बैठकीला गैरहजर राहून खडसे यांनी आपली नाराजी स्पष्ट करताच समर्थकांनी जळगावात आंदोलनं सुरू केली आहेत. खडसेंवर कारवाई केल्यास त्याचे काय पडसाद उमटतील याची झलक या निमित्ताने दाखवण्याचा हा प्रयत्न होता.

आठवडाभरापासून खडसेंनी आपला मुक्काम जळगावात ठोकला आहे. दिवसभर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी, रात्री पदाधिकार्‍यांसोबत बैठकीचे सत्र सुरू ठेवून दबाव कायम ठेवला आहे. त्यातच जळगावच्या 14 खडसे समर्थक नगरसेवकांनी त्यांच्या समर्थनार्थ राजीनाम्याचे दबावतंत्र अवलंबले आहे. जोडीला खडसे समर्थक आमदारांच्या भेटीगाठी सुरू आहेत. एवढ्या घडामोडीनंतरही प्रदेशाध्यक्षांनी मूळ मुद्द्याला बगल दिली.

मंत्रिमंडळ बैठकीला दांडी मारून जेव्हा खडसेंनी मुक्ताईनगर गाठले, मुक्ताईदेवीच्या सोहळ्याला जाताना त्यांनी लाल दिव्याची गाडी टाळली. तेव्हाच खडसेंची नाराजी स्पष्ट झाली होती. मंत्रिपद महत्त्वाचे नाही असे म्हणून आपण झुकणार नसल्याचे सूचित केले होते.

नाकापेक्षा मोती जड असे मानल्या जाणार्‍या खडसेंना लगेचच मंत्रिपदावरून दूर करणे पक्षाला जड जातेय. मात्र महसूल खाते काढून त्यांचे पंख छाटण्याचा प्रयोग भाजपने केला तर आश्चर्य वाटायला नको.

मुक्काम पोस्ट जळगाव, खडसेंचं दबावतंत्र

- 3 दिवसांपासून खडसे जळगावी मुक्कामी - मंगळवारपासून खडसे लाल दिव्याची गाडी वापरत नाही - मंत्रिपद महत्त्वाचं नसल्याचं मुक्ताईनगरमध्ये केलं सूचक विधान - दिवसभर जनसंपर्क, भेटीगाठी, रात्री बैठकीचं सत्र - खडसे समर्थकांचं रस्त्यावर उतरून शक्तिप्रदर्शन - 14 समर्थक नगरसेवक, पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत - 4 समर्थक आमदारांची प्रदेशाध्यक्षांसोबत बैठक - खडसेंवर अन्याय होत असल्याची केली तक्रार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा


First published:

Tags: BJP, Eknath khadse, Jalgaon, एकनाथ खडसे, जळगाव, भाजप

पुढील बातम्या