20जून : मुंबईतील वरळी इथल्या वादग्रस्त कॅम्पा कोला सोसायटीचे अनधिकृत फ्लॅट्सवर कारवाई करण्यास रहिवाशांनी तीव्र विरोध केलाय. त्यामुळे पलिकेच्या अधिकार्यांना तुर्तास माघार घ्यावी लागली आहे. पोलीसबळ कमी आहे त्यामुळे पुढच्या कारवाईबाबत वरिष्ठांशी चर्चा करून निर्णय घेऊ असं पालिकेच्या अधिकार्यांनी सांगितलं. कॅम्पा कोलावासियांनी केलेला विरोध हा सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणार असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे.
कॅम्पा कोलाच्या सात इमारतींमध्ये पाचव्या मजल्याच्यावर असणार्या 102 अनधिकृत फ्लॅट्सवर ही कारवाई होणार आहे. कॅम्पा कोलावर कारवाईसाठी दिलेल्या मुदतीचा कालचा शेवटचा दिवस होता. सकाळी साडे अकराच्या सुमारास पालिकेचे आधिकारी कॅम्पा कोलाच्या परिसरात दाखल झाले. मात्र जीव गेला तरी चालेल पण घर सोडणार नाही अशी ठाम भूमिका कॅम्पा कोलावासियांनी घेतली त्यामुळे अधिकार्यांनी काही तासांसाठी कारवाई स्थगित केली आहे. आज होणारी कारवाई काहीही करून टळावी म्हणून रहिवाशांनी सोसायटीच्या दोन्ही गेटवर होमहवन केला.
पालिकेचे अधिकारी कॅम्पा कोला सोसायटीचे फक्त वीज, पाणि आणि गॅसचं कनेक्शन तोडण्याच्या तयारीत आहेत. मुंबई पोलिसांनीही कॅम्पा कोलाच्या परिसरात मोठा बंदोबस्त ठेवला आहे. इमारतीच्या दोन्ही बाजूला काल रात्रीच बॅरिकेट्स लावण्यात आले होते. दरम्यान या कारवाईला कॅम्पा कोलाच्या रहिवाशांनी विरोध केल्याचं चित्रिकरण पालिकेकडून केलं जात आहे. आणि हे सीसीटीव्ही फुटेज सुप्रीम कोर्टाच्या आदेशाच्या अवमानाचा पुरावा म्हणून सादर केलं जाईल.
कॅम्पाकोलाचं राजकारण
कॅम्पा कोला प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी हात झटकलेत. कॅम्पा कोलाला वाचवलं तर प्रत्येक अनधिकृत बांधकामाचा बचाव करावा लागेल असं त्यांनी म्हटलंय. कॅम्पा कोलाबाबत तोडगा काढण्यासाठी कोणताही प्रस्ताव आला नाही, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. तर असाच काही प्रस्ताव आला असता तर विचार केला असता, असंही ते म्हणाले.
सुप्रीम कोर्टानं सुचवल्यानंतरही सरकारनं कॅम्पा कोला वाचवण्यासाठी मार्ग काढला नाही, असा आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सरकारची तशी इच्छाशक्ती दिसली नाही अशी टीकाही फडणवीस यांनी केली. शिवसेनेचे दक्षिण मुंबईतले खासदार अरविंद सावंत यांनीही असाच आरोप केला आहे. मात्र सुप्रीम कोर्टाच्या आदेशानेच राज्य सरकारनं कारवाईत कोणताही हस्तक्षेप केला नसल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान इथे विरोध करण्यासाठी जमलेल्या आरपीआयच्या कार्यकर्त्यांना पोलीसांनी ताब्यात घेतलं. तर दुसरीकडे कोणत्याही परिस्थितीत बीएमसीच्या कर्मचार्यांना गेटच्या आत येऊ देणार नाही, शेवटपर्यंत संघर्ष करत राहू, अशी भूमिका इथल्या रहिवाशांनी घेतली आहे.
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Raj thakre, Sc, Supreme court decision, कॅम्पा कोला, कॅम्पाकोला, लता मंगेशकर, सुप्रीम कोर्ट, सुप्रीम कोर्टाचे आदेश