21 जानेवारी : दिल्लीत पोलिसाविरोधात 'आप' सरकारने पुकारलेल्या आंदोलनामुळे टीकेला सामोरं जावं लागत आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या एकेकाळच्या सहकारी किरण बेदी यांनी या आंदोलनावरून केजरीवाल यांच्यावर जोरदार तोफ डागलीय. किरण बेदी यांनी ट्विटवर संतप्त प्रतिक्रिया दिलीय.
भारताच्या राष्ट्रपतींनी अराजकता माजवणारं लोकनियुक्त सरकार वेळ न दवडता बरखास्त केलं पाहिजे अशी मागणी बेदी यांनी केलीय. इतकंच नाही, तर दिल्ली सरकार बरखास्त करून तिथे राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणीही बेदी यांनी केलीये. जनलोकपाल आंदोलनात किरण बेदी या केजरीवाल यांच्या सहकारी होत्या.
मात्र केजरीवाल यांनी पक्ष स्थापन केल्यानंतर टीम अण्णा संपुष्टात आली. अलीकडेच बेदी यांनी भाजपचे पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा दिला होता. त्यानंतर आज बेदी यांनी आप सरकार बरखास्त करण्याची मागणी केलीय.
फक्त किरण बेदीच नाही तर जनलोकपाल आंदोलनातले केजरीवाल यांचे आणखी एक सहकारी कर्नाटकचे माजी लोकायुक्त संतोष हेगडे यांनीही केजरीवाल यांच्या आंदोलनावर टीका केलीय. "एखादी व्यक्ती कितीही मोठी असली तरी ती कायद्यापेक्षा मोठी नाही, हे सरकारने शिकवलं पाहिजे. दुदैर्वानं आज ते होत नाहीय. जनतेच्या हक्कांच्या बाता करणारं सरकार आज स्वत:च जनतेच्या हक्कांची पायमल्ली करत आहे, याचं मला वाईट वाटतंय." अशी प्रतिक्रिया हेगडे यांनी दिली. तर आम आदमी पार्टीचे बंडखोर आमदार विनोद कुमार बिन्नी यांनी पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर तोफ डागलीय. लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्यासाठी आणि सतत माध्यमामध्ये चर्चेत राहण्यासाठी केजरीवाल हा स्टंट करतायेत, असा आरोप बिन्नी यांनी केलाय.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.