मराठी बातम्या /बातम्या /बातम्या /'अंनिस'चे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून

'अंनिस'चे संस्थापक डॉ.नरेंद्र दाभोलकरांचा खून

  narendra dabholkar 20 ऑगस्ट :अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक आणि साधना साप्ताहिकाचे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचा आज सकाळी सव्वा 7च्या सुमाराला अज्ञात हल्लेखोरांनी खून केला. पुण्यामध्ये ओंकारेश्वर पुलावर दोन अज्ञात हल्लेखोरांनी त्यांच्यावर चार गोळ्या झाडल्या. त्यातल्या दोन गोळ्या दाभोलकरांना लागल्या. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला.

  त्यांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. घटना प्रत्यक्ष पाहणार्‍या एका साक्षीदारानं हल्लेखोरांच्या मोटारसायकलचा नंबर टिपून ठेवला. हल्लेखोर काळ्या रंगाच्या स्ल्पेंडर मोटरसायकलवरून आले होते. त्यावरून तपास सुरू आहे.

  दाभोलकरांच्या खुनाची बातमी पसरल्यानंतर राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. हा हल्ला फॅसिस्ट शक्तींनी केलाय, समाजातल्या पुरोगामी विचारवंतांचा आवाज दडपण्याचा असहिष्णू शक्ती प्रयत्न करत आहेत. त्याबद्दल आता जागं होण्याची वेळ आलीय, असं परखड मत व्यक्त करण्यात येतंय.

  घटनाक्रम

  नरेंद्र दाभोलकरांनी राज्यभर फिरून अंधश्रद्धाविरोधात जनजागृती केली. त्यांच्या या कार्याचं केंद्र होतं पुणे... पुण्यातून निघणार्‍या साधना साप्ताहिकाच्या माध्यमातून त्यांनी ही चळवळ राबवली. दुदैर्व म्हणजे याच पुण्यात त्यांचा खून झाला.

  रोजच्या सवयीप्रमाणे मंगळवारी सकाळीही सातच्या सुमाराला डॉ.नरेंद्र दाभोलकर फिरायला निघाले. शनिवार पेठेत बालंगधर्व रंगमदिराकडून ओंकारेश्वर मंदिराकडे जाणार्‍या पुलावरून ते जात होते. तेव्हा सात वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला अचानक.. 25 ते 30 वर्षं वयाचे दोन तरूण काळ्या स्प्लेंडरवरून आले. त्यांनी बाईक लावली आणि दाभोलकरांवर पाठीमागून चार गोळ्या झाडल्या. त्यापैकी दोन गोळ्या दाभोलकरांच्या डोक्यात शिरल्या. आणि ते खाली कोसळले. त्याच क्षणी.. दोघंही हल्लेखोर पुन्हा बाईकवर बसून परागंदा झाले.

  हल्लेखोरांपैकी एकाच्या डोक्यावर रेनी कॅप होती तर दुसर्‍याच्या पाठीवर एक बॅग होती. तिथे उपस्थित असलेल्या एका प्रत्यक्षदर्शीने पोलिसांना ही माहिती दिली. घटनास्थळापासून फक्त 25 फुटांवर.. म्हणजे अगदी हाकेच्या अंतरावर डेक्कन पोलीस स्टेशन आहे. बातमी कळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठलं आणि दाभोलकरांना ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. पण, त्यापूर्वीच त्यांची प्राणज्योत मालवली होती.

  डॉ. दाभोलकर यांचा जीवन प्रवास

  डॉ.नरेंद्र दाभोलकर... महाराष्ट्रातल्या पुरोगामी चळवळीला कित्येक पावलं पुढे घेऊन जाणारे सच्चे, अहिंसावादी कार्यकर्ते. त्यामुळेच महाराष्ट्राला दाभोलकरांची खरी ओळख विवेकवादी सामाजिक कार्यकर्ते म्हणून झाली.

  दाभोलकरांचं कुटुंब सातारचं... नरेंद्र दहा भावंडांपैकी सर्वात लहान. शालेय शिक्षण सातार्‍यात पूर्ण करून.. त्यांनी मिरजेच्या मेडिकल कॉलेजमधून MBBSची पदवी मिळाली. पत्नीच्या मदतीने 12 वर्ष दोन दवाखाने चालवल्यानंतर..त्यांनी डॉक्टरीचा पेशा सोडला. विज्ञानयात्रा हे निमित्त ठरलं.आणि त्यांनी स्वतःला पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून झोकून दिलं.

  त्याआधी 60 ते 70 च्या दरम्यान त्यांच्या विचारांची जडणघडण झाली होती. समाजवादी युवक दलात सक्रीय असताना त्यांच्या सत्यशोधक आणि चिंतनशील प्रवृत्तीला चालना मिळत गेली. समाजातल्या विवेकाचा र्‍हास आणि रुढी-परंपरा-अंधश्रद्धा यांच्या वाढत्या प्रकारामुळे ते अस्वस्थ झाले. जयप्रकाश नारायण यांच्या आंदोलनाची धग अजूनही विझली नव्हती. 80 च्या दशकात अब्राहम कौैर आणि बी.प्रेमानंद यांच्या विचारांनी प्रभावित झालेल्या दाभोलकरांनी त्यांचा वारसा महाराष्ट्रात पुढे चालवला.

  तीन दशकांहून अधिक काळ अंधश्रद्धा निर्मूलनाची चळवळ त्यांनी महाराष्ट्रात रुजवली. आणि कार्यकर्त्यांची मोठी फळी तयार केली.

  साने गुरुजी यांनी सुरु केलेल्या साधना नियतकालिकाची धुरा 1998 पासून त्यांनी स्वत:कडे घेतली. तरुणांपर्यंत विवेकनिष्ठ विचार पोहचवण्यासाठी त्यांनी साधना साप्ताहिकाला नवं रुप दिलं. नुकताच साधना साप्ताहिकाचा 65 वा वर्धापन दिन पुण्यात साजरा करण्यात आला.

  डॉ.दाभोलकर महाराष्ट्राच्या कब्बडी संघाचे सदस्य होते आणि कबड्डीतल्या संघटनकौशल्यासाठी त्यांना क्रीडाक्षेत्रातला सर्वोच्च शिवछत्रपती पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं होतं. दाभोलकरांच्या संघटनकौशल्याचं उत्कृष्ट उदाहरण म्हणजे सामाजिक कृतज्ञता निधी. 1987 साली वंचितांचे प्रश्न घेऊन काम करणार्‍या पूर्णवेळ सामाजिक कार्यकर्त्यांसाठी मानधन देण्याची जबाबदारी बाबा आढाव आणि अनिल अवचटांच्या मदतीने नरेंद्र दाभोलकरांनी घेतली.

  72च्या दुष्काळग्रस्तांचे प्रश्न असो... नर्मदा आंदोलनाचा संघर्ष असो की दलित-मुस्लिम-आदिवासी-वंचित कोणत्याही समाजघटकातील प्रश्न... दाभोलकर नेहमीच या सगळ्यांसाठी आधारस्तंभ होते. जातपंचायतीविरोधातही अंनिसने गेल्या महिन्यात आंदोलन छेडत एक अभियान सुरु केलं. जादूटोणाविरोधक विधेयकाचा गेली अनेक वर्ष ते पाठपुरावा करत होते. पण राज्यसरकार हे विधेयक पास करुन घ्यायला आजपर्यंत अयशस्वी ठरलं. या कायद्यासाठी आमरण उपोषण करायची इच्छाही त्यांनी बोलून दाखवली होती. दाभोलकर नेहमी म्हणायचे की अहिंसावादी विचार हेच हिंसेला उत्तर असेल. दाभोळकरांचा अंत हिंसेने झाला असला तरी त्यांच्या विचारांना संपवण या मारेकर्‍यांना शक्य नाही. डॉ नरेंद्र दाभोलकरांना आयबीएन लोकमतची आदरांजली.

  First published:
  top videos