इंदौर, 31 डिसेंबर : मध्य प्रदेशातील इंदौरमध्ये (Indore City) लोकांना स्वच्छतेची सवय असून आता ही सवय त्यांच्या कार्यक्रमांमध्येही सामिल झाली आहे. शहरातील एक अनोख्या लग्नसमारंभात याच उदाहरण पाहायला मिळालं. इंदोरमधील हे लग्न झिरो वेस्ट थीमवर (Zero Waste Theme) आधारित होतं. लग्न पत्रिका रद्दीत जाऊ नयेत, यासाठी कागदाऐवजी ई-कार्ड देण्यात आले.
एवढंच नाही तर, संपूर्ण लग्न समारंभात अशा कोणत्याच वस्तूचा उपयोग करण्यात आला नाही, ज्यामुळे कचरा निर्माण होईल आणि ज्याला नष्ट करता येणार नाही. दोन दिवस असणाऱ्या या समारंभात केवळ 40 किलो ओला कचरा काढण्यात आला. मात्र लग्न समारंभास्थळीच तो कंपोस्टमध्ये रुपांतरित करण्यात आला.
झिरो वेस्ट थीम मॅरेज -
हे अनोखं लग्न माचल गावात एका गार्डनमध्ये झालं. इंदोर आयआयटीतून मॅकेनिकल इंजिनियर रोहित अग्रवाल आणि इंटीरियर डिझायनर पुजा गुप्ताने झिरो वेस्ट थीमवर लग्न करण्याचा निर्णय घेतला. एका समाजसेवी कार्यक्रमात रोहितला 'कचरा करुन, लग्नाचा कचरा करू नका' या विषयावर आपलं मत मांडण्यास सांगितलं होतं. त्यावेळी त्याने स्वत:च्या लग्नात कचरा न करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी त्याचं लग्न ठरल्यानंतर, होणाऱ्या पत्नीलाही त्याने झिरो वेस्ट थीमबाबत सांगितलं, आणि तीदेखील तयार झाली.
लग्नात सजावटीसाठी कोणताही कचरा निर्माण होणाऱ्या वस्तूचा वापर करण्यात आला नाही. जेवणासाठी स्टीलच्या ताटांचा वापर करण्यात आला. तसंच पाहुण्यांना जेवण वाया न घालवण्याचा आग्रह करण्यात आला. जेवण बनवताना तयार झालेला भाज्यांचा कचरा जागेवरच कंपोस्ट करण्यात आला. आणि इतर कचरा वेस्ट कन्वर्टर व्हॅनमध्ये पाठवण्यात आला. या दोघांनी स्वाह नावाचं एक स्टार्टअप तयार केलं आहे आणि त्यांच्या या स्टार्टअपने अनेक अवॉर्डही जिंकले आहेत.
एका लग्नात होतो 2 हजार किलो कचरा -
साधारणपणे, एका हॉटेलमधून दररोज 400 ते 500 किलो कचरा निघतो. हॉटेलमध्ये लग्न समारंभ असल्यास, कचऱ्यांचं प्रमाण वाढून दोन हजार किलोपर्यंत होतं. इंदोर शहरात सध्या दररोज 800 ते एक हजार टन कचरा निघतो. आणि त्याला प्रोसेस करण्यासाठी ट्रेंचिंग ग्राउंडसह दुसऱ्या ठिकाणी पाठवला जातो. कोरोना काळाआधीपासूनच, होळकर स्टोडियममध्ये अनेक आंतरराष्ट्रीय मॅच झिरो वेस्ट थीमवर झाल्या आहेत.