नवी दिल्ली, 2 मे : वादग्रस्त धर्मोपदेशक झाकीर नाईकची 50 कोटींपेक्षा जास्त संपत्ती सक्तवसुली संचालनालयाने (ED) जप्त केली आहे. इस्लामिक रिसर्च फाउंडेशन या झाकीर नाईकच्या संस्थेवर केंद्र सरकारने या अगोदरच पाच वर्षांची बंदी घातली आहे.
गुरुवारी ED ने झाकीरच्या मालमत्तेवर ताबा मिळवला. झाकीर आणि त्याच्या साथिदारांची 196.06 कोटी संपत्ती बेहिशोबी असल्याचं लक्षात आल्यानंतर ED ने कारवाई सुरू केली.
झाकीर नाईक 2016 पासून फरार आहे. तो देश सोडून पळून गेला आहे. सुरुवातीला सौदी अरेबियाच्या आश्रयाला असल्याचं बोललं जात होतं. आता तो मलेशियात शरणार्थी म्हणून राहात असल्याची माहिती आहे. धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे, भारताविरोधात युद्ध छेडणे, राष्ट्रविरोधी कारवाई करण्यासाठी पैसा वळवणे. अशा प्रकारचे गंभीर गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. NIA या संबंधी तपास करत आहे.
भारताने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्यासाठी दबाव आणला आहे. इंटरपोलच्या मदतीने त्याला भारतात आणायचा भारत प्रयत्न करत आहे.