कैमूर, 29 डिसेंबर: गावातील पंचायतीने न्यायनिवाडा करत असताना एका तरुणाला थुंकी चाटायला लावल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. पंचायतीत दिलेल्या अपमानास्पद वागणुकीमुळे पीडित तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली आहे. एका प्रेम प्रकरणाचा न्यायनिवाडा देताना पंचायतीने या तरुणाला ही अपमानास्पद वागणूक दिली. हा अपमान या तरुणाच्या इतका जिव्हारी लागला की त्यानं आपलं जीवन संपवलं आहे. या प्रकरणी युवकाच्या कुटुंबीयांनी पोलिसांत तक्रार दाखल केली आहे.
मुलीच्या कुटुंबियांवर केला आरोप
मिळालेल्या माहितीनुसार, हा धक्कादायक प्रकार बिहारमधील कैमूर येथे घडला आहे. या प्रकरणातील मृत युवकाचं नाव शिवशंकर गुप्ता असं असून तो एका मुलीवर प्रेम करीत होता. नंतर या मुलीने प्रेमाच्या आडून या मुलाकडे पैशांची मागणी केली. पैशाची जमवाजमव करण्यासाठी या युवकानं चार दिवसांची मुदत मागितली पण मुलीने काहीही ऐकलं नाही. त्यानंतर तिनं त्या युवकाकडून त्याचा मोबाइल जबरदस्तीने हिसकावून घेतला आणि घरी जाऊन तिच्या भावांकडे दिला. शिवाय मृत युवकावर विनयभंगाचा आरोपही लावला. यामुळं मुलीच्या कुटुंबियांची आणि मुलाच्या कुटूंबियांची भांडणं झाली. त्यानंतर गावकऱ्यानी मध्यस्थी करण्यासाठी पंचायत बोलावली गेली. ज्यामध्ये या युवकाला मारहाण करण्यात आली आणि थुंकी चाटायला लावली. तसेच पैशाची मागणीही करण्यात आली.
फाशी घेऊन जीव दिला
हे प्रकरण पंचायतीत सोडवण्यात आलं होतं. पण पंचायतीत तरुणाला दिलेली अपमानास्पद वागणूक त्याच्या जिव्हारी लागली. यामुळे त्याने टोकाचं पाऊल उचलत गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. मुलीच्या कुटूंबाने आत्महत्या करण्याचा दबाव निर्माण केल्याचा आरोप मृत युवकाच्या कुटुंबियांनी केला आहे. मृताच्या वडीलांनी सांगितलं की, पंचायतीनंतर तो तरुण थेट घरी गेला. त्यावेळी तो कोणाशीच काही बोलला नाही आणि रात्री घरातील पंख्याला फाशी घेऊन त्यानं आत्महत्या केली.
कैमूरचे एसपी काय म्हणाले
कैमूरचे एसपी दिल नवाज अहमद यांनी सांगितलं की, एका युवकानं आत्महत्या केली आहे. प्रेम प्रकरणात पंचायत बोलवली होती आणि पंचायतीत तरूणावर अत्याचार केल्याचा आरोप कुटुंबियांनी केला आहे. यामुळे त्या तरुणाने आत्महत्या केली आहे. शवविच्छेदनानंतरच मृत्यूचं खरं कारण समजेल. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करीत आहेत.