गाझियाबाद, 13 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशातील गाझियाबाद जिल्ह्यातील मोदीनगर येथे एसडीएम पदावर असणाऱ्या युवा महिला आयएएस अधिकारी सौम्या पांडेय यांचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. कोरोना काळात एका मुलीला जन्म दिल्यानंतर महिन्याभराहून कमी काळातच त्यांनी पुन्हा कार्यालयात हजेरी लावली आहे. आपल्या नवजात बाळासह, ऑफिसमध्ये फाईल्स हाताळताना त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
कोरोना काळात आपली जबाबदारी ओळखून सौम्या पांडेय यांनी डिलिव्हरीच्या केवळ 22 दिवसांनंतर कार्यालयात जाण्यास सुरुवात केली. त्यांच्या याच कर्तव्यदक्षतेचं सोशल मीडियावर कौतुक होत आहे.
मोदीनगर तहसीलमधील एसडीएम सौम्या पांडेय आपल्या मुलीला घेऊनच जनसेवा करत आहेत. मूळच्या प्रयागराज येथे राहणाऱ्या सौम्या यांची गाझियाबादमध्ये पहिलीच नियुक्ती आहे. मुलीला जन्म दिल्यानंतर केवळ 22 दिवसांच्या कालावधीतच, जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर त्यांनी आपला कार्यभार पुन्हा एकदा हाती घेतला आहे. सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडिओमध्ये त्या आपल्या चिमुकलीला घेऊनच काम करत असल्याचं दिसतंय.
SDM सौम्या पांडेय यांनी न्यूज 18शी याबाबत बोलताना सांगितलं की, महिला आधीपासूनच अशाप्रकारची कामं करत आहेत. आधीही अनेक महिला अधिकारी आपल्या कुटुंबासोबतच, शासकीय सेवेत कार्यरत आहेत. माझ्या मुलीला घेऊन ऑफिसमध्ये, काम करण्यासाठी माझ्या कुटुंबाचा पूर्ण पाठिंबा आहे. त्याशिवाय गाझियाबाद जिल्हाधिकाऱ्यांचंही सहकार्य आहे. मुख्यमंत्र्यांनी कोरोनाचा प्रादुर्भाव कमी करण्याचं काम एका मिशनच्या रुपात होती घेतलं आहे. त्यामुळे सध्याची परिस्थिती पाहता अधिकाऱ्यांचं कार्यालयात हजर असणं अधिक महत्त्वाचं आहे, असं त्यांनी सांगितलं.
'दिवसभरात अनेकदा मला कोविड रुग्णालयात जावं लागतं. त्यानंतर कार्यालयातून घरी गेल्यावर, घरातील सर्वांच्या सुरक्षिततेसाठी आधी स्वत:ला आणि त्यानंतर सर्व फाईल्सही सॅनिटाईज कराव्या लागतात. माझ्या मुलीसोबतच, संपूर्ण लोकांचीही काळजी घेणं, ही माझी जबाबदारी आहे,' असंही त्या म्हणाल्या.