इंदूर, 3 जून : रस्ते अपघात नियंत्रण ठेवण्यासाठी प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात असल्या तरी देशात आजही अपघातांचं (Road Accident) प्रमाण मोठं आहे. खराब रस्ते, वाहनांची वाढलेली संख्या यासह नियम न पाळत वाहन चालवणे, या कारणांमुळं अपघात घडत असतात. असाच एक थरारक अपघात घडला आहे. यात कंटेनर खाली आलेली तरुणी गंभीर जखमी झाली आहे. तिचा एक पाय तुटला असून तो आता जोडला जाण्याची शक्यता फार कमी आहे.
हा अपघात फारच भयानक होता. कंटेनर आणि तरुणीच्या दुचाकीचा अपघात झाल्यानंतर ही तरुणी कंटेनरच्या चाकाखाली आल्यानंतर ती जवळपास 20 फूट फरफटत गेली. विशेष म्हणजे या अवस्थेतही तीन आपला फोन काढून वडिलांना अपघात घडल्याची माहिती दिली आणि लवकरात लवकर दवाखान्यात येण्यास सांगितलं.
घटनास्थळी उपस्थित लोकांनी तिला आणि तिच्या मैत्रिणीला तत्काळ रुग्णालयामध्ये दाखल केले. कीर्ती असं या 28 वर्षीय तरुणीचं नाव आहे. हा सर्व प्रकार इंदूरच्या बाणगंगा पोलीस ठाणे क्षेत्रात घडला. तरुणी येथील गांधीनगरच्या एका औषध कंपनीत काम करत आहे. तिचे वडील जेव्हा रुग्णालयात दाखल झाले तेव्हा तिच्या पायाची अवस्था पाहून त्यांना धक्का बसला.
संध्याकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ही तरुणी औषध कंपनी सन फार्मा येथून आपल्या घरी निघाली होती. त्यावेळी रस्त्याने जात असताना मागून आलेल्या कंटेनरनं (09 एचएच 9262) तिला धडक दिली. त्यावेळी तिच्या सोबत गाडीवर योहानन नावाची मुलगी होती, ती डाव्या बाजूला पडली. मात्र, कीर्तीचा पाय कंटेनरच्या मागल्या चाकामध्ये अडकला आणि ती कंटेनरसोबत जवळपास 20 फूट फरपटत गेली. अपघात झाल्यानं पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या चालकानं गाडी लवकर थांबवली नाही. त्यामुळं कीर्ती फरपटत पुढं गेली. रस्त्यावर आजूबाजूला उपस्थित लोकांनी कंटेनर अडवून त्याला थांबवलं. मात्र, तोपर्यंत किर्तीचा डावा पाय गुडघ्यापासून खाली तुटून बाजूला पडला होता.
हे वाचा - देशातील कोरोनाची दुसरी लाट आटोक्यात? काय सांगतायत नवे आकडे, वाचा सविस्तर
भीषण अपघात झाला असतानाही स्वतः वडिलांना केला फोन
अपघात घडण्याच्या अगोदर काही वेळापूर्वीच तिनं वडिलांना फोन केला होता. ते तिला फाट्यावरून नेण्यासाठी एका चौकात थांबले होते. त्यांनी सांगितलं की, इतका मोठा अपघात झाल्यानंतरही तिनं न घाबरता स्वतः मला फोन केला आणि माझा अपघात झाला असल्याचे सांगितले. तुम्ही दवाखान्यात लवकर या, असे सांगितले. तोपर्यंत घटनास्थळावरील नागरिकांनी त्या दोघींना आणि तुटलेला पाय सोबत घेऊन रुग्णालयात दाखल केले. पाय जोडता येईल किंवा नाही यावर जवळपास एक तास तज्ज्ञ डॉक्टरांशी चर्चा केल्यानंतर तिचा पाय जोडता येणार नाही, असं स्पष्ट झालं. त्यामुळं गुडघ्यापर्यंत तिचा पाय कापण्याचा निर्णय घेण्यात आला. दरम्यान कंटेनर चालक अपघातानंतर पळून गेला आहे. 22 चाकांचा हा कंटेनर पोलिसांनी जप्त केला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.