नवी दिल्ली, 08 डिसेंबर : कृषी कायद्यावरून (farmers act 2020) एकीकडे शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. तर दुसरीकडे भाजप (BJP)विरुद्ध राष्ट्रवादी (NCP) असा वाद पेटला आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांना 2010 च्या कथित पत्राबद्दल सवाल विचारला असता त्यांनी यावर खुलासा केला आहे. परंतु, पत्रकारांनी वारंवार एकच प्रश्न रेटून धरल्यामुळे शरद पवार चांगले भडकल्याचे पाहण्यास मिळाले.
शरद पवार यांनी दिल्ली संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलत असताना त्यांनी पुरंदर विमानतळाबाबत ही भेट घेतल्याचे सांगितले. यावेळी आपण शेतकरी आंदोलनावर बोलणार नाही, असं पवारांनी स्पष्ट केले होते.
पण, भाजप नेत्यांनी 2010 चे तुमचे पत्र दाखवून आरोप केला आहे, असे पत्रकारांनी विचारले असताना पवार म्हणाले की, 'मी पत्र लिहिले होते ते खरं आहे. पण, माझ्या पत्राचा जी लोकं उल्लेख करीत आहे. त्यांनी माझे पत्र नीट वाचावे. मी माझ्या पत्रात एपीएमसी मार्केटबद्दल सुधारणा केली पाहिजे, असं बोललो आहे. पण आज मोदी सरकारने जे कृषी कायदे केले आहे. त्यामध्ये एपीएमसी मार्केटचा उल्लेखच नाही. त्यामुळे आमचे नाव घेऊन आम्हाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात आहे', अशी टीका पवार यांनी केली.
'आम्ही उद्या राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची 5.30 वाजता भेट घेणार आहोत. त्यावेळी त्यांच्याकडे मागणी करणार आहोत' असंही पवार म्हणाले.
परंतु, एक पत्रकार 2010 च्या पत्राचा वारंवार उल्लेख करत पवारांना प्रश्न विचारता होता, त्यामुळे शरद पवार चांगलेच संतापले. 'तुम्ही लोकं बाहेर उभे होते, ते पाहून मला बरं वाटलं नाही म्हणून मी तुम्हाला इथं बोलावलं. पण, उत्तर देऊनही तुम्ही एकच प्रश्न विचारून माझा वेळ वाया घालवत आहात. मी तुम्हाला इथं बोलावून चुकी केली आहे, यापुढे तुम्हाला बोलावणार नाही' असं म्हणत शरद पवार यांनी पत्रकारांना उत्तर न देता निघून गेले.