नवी दिल्ली 15 मे : काँग्रेसच्या राजधानी दिल्लीत होत असलेल्या दैनंदिन पत्रकार परिषदेत बुधवारी योगी आदित्यनाथ यांच्या समर्थकाने गोंधळ घातला. पत्रकार परिषद सुरू असतानाच हा समर्थक उठला आणि त्याने राष्ट्रध्वज फडकवत घोषणा दिल्या. त्यामुळे काही वेळ पत्रकार परिषद थांबवावी लागली.
काँग्रेसचे प्रवक्ते पवन खेरा हे दैनंदिन पत्रकार परिषद घेत असताना अचानक त्यांना आपली पत्रकार परिषद थांबवावी लागली. त्याचं कारण म्हणजे योगी आदित्यनाथ यांच्याबाबतीत त्यांनी जे संबोधन वापरलं ते त्यांच्या एका समर्थकाला आवडलं नाही.
योगी आदित्यनाथ यांनी संन्यास घेण्याच्या आधी त्यांचं नाव अजयसिंग बिश्त असं होतं. खेरा यांनी आदित्यनाथ यांचं नाव घेताना त्यांच्या जुन्याच नावाचा वापर केला. त्यामुळे खवळलेला हा समर्थक उठला आणि त्याने पवन खेरा यांच्यासमोर जाऊन तिरंगा झेंडा फडकवत घोषणा द्यायला सुरूवात केली.
आदित्यनाथ यांना अजयसिंग बिश्त असं म्हणणं हा भारतीय संस्कृतीचा अपमान आहे असं त्याचं म्हणणं होतं. वंदे मातरम्, भारत माता की जय अशा घोषणाही त्याने दिल्या. त्यानंतर त्याला बाजूला नेण्यात आले. पण या गोधळात खेरा यांना काही काळ पत्रकार परिषद थांबवावी लागली. नंतर त्यांनी घटनेचा निषेध करत आपलं म्हणणं मांडलं.
#WATCH Delhi: A man interrupts the media briefing by Congress Spokesperson Pawan Khera, shouts "Yogi Adityanath ko Ajay Singh Bisht kehna Bharatiya sanskriti ka apmaan hai, Vande Mataram, Bharat mata ki jai" pic.twitter.com/pRDNd7WKsc
— ANI (@ANI) May 15, 2019
योगी आदित्यनाथ यांची ममता बॅनर्जींवर टीका
लोकसभा निवडणुकीचा मतदानाचा शेवटचा टप्पा राहिला असताना पश्चिम बंगालमध्ये रणकंदन माजलंय. भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये महाभारत सुरू आहे. आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालचं 'बगदीदी' बनायचं आहे असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय.
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशोवरून मंगळवारी कोलकात्यात राडा झाला होता. त्यावरून योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर शब्दात टीका केलीय.
इस्लामीक स्टेटचा प्रमुख बगदादी यांच्या प्रभावाने तुम्हाला बंगालचा बगदीदी व्हायचं आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला आम्ही मुख्य प्रवाहापासून तोडू देणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.