नवी दिल्ली 25 सप्टेंबर: सक्तवसूली संचालनालयाने (Enforcement Directorate) ने यस बँकेचे (Yes Bank) सह-संस्थापक राणा कपूर (Rana Kapoor) यांची लंडनमधली संपत्ती जप्त केली आहे. 77 साउथ ऑडली स्ट्रीट इथं त्यांच अपार्टमेंट होतं. या अपार्टमेंटची किंमत 13.5 मिलियन पाउंड म्हणजेच तब्बल 127 कोटी रुपये एवढी आहे. कपूर यांनी 2017मध्ये 9.9 मिलियन पाउंडला (93 कोटी ) हे घर घेतलं होतं.
न्यायालयीन कोठडीमध्ये असलेले राणा हे घर विकण्याच्या प्रयत्नांमध्ये होते अशी माहिती ईडीच्या सूत्रांनी दिली. कपूर यांनी लाच घेऊन अनेक कंपन्यांना कोट्यवधींची कर्ज दिली आणि नंतर ती कर्ज ही एनपीए म्हणून दाखविण्यात आली होती. त्यामुळे बँकेचं काही हजार कोटींचं नुकसान झालं होतं.
दीवान हाउसिंग फायनान्स कॉर्पोरेशन लिमिटेड (डीएचएफएल) च्या मनी लाँड्रिंग प्रकरणात एनफोर्समेंट डायरेक्टरेट (ईडी) ने येस बँकेचे सीईओ राणा कपूर यांना 8 मार्चला रविवारी पहाटे अटक केली होती. ईडीच्या अधिकार्यांनी सुमारे 20 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक केली होती.
राणा कपूर यांनी अधिकारांचा गैरवापर करुन हजारो कोटी रुपये परदेशात पाठवले. त्याच सोबत काही कंपन्यांना नियम बाह्य अर्थ साह्य केलं असून कानपूर, दिल्ली इथं दाखल एका प्रकरणी ईडी तपास करत होती. त्यातून राणा कपूर यांचे नाव समोर आलंय. राणा कपूर यांच्या घरातील एका व्यक्तीच्या खात्यात वेळो वेळी मोठी रक्कम परदेशातून आल्याची माहिती देखील ईडीला सूत्रांनी दिली.