येडियुरप्पा सरकारची परीक्षा, कर्नाटकात 15 जागांसाठी आज पोटनिवडणूक

येडियुरप्पा सरकारची परीक्षा, कर्नाटकात 15 जागांसाठी आज पोटनिवडणूक

कर्नाटकमध्ये 15 जागांसाठी आज पोटनिवडणूक. सहा जागा जिंकणं सत्ताधारी भाजपसाठी आवश्यक.

  • Share this:

संदीप राजगोळकर, (प्रतिनिधी)बंगळुरू, 05 डिसेंबर: कर्नाटकमध्ये गुरुवारी सकाळपासून विधानसभेच्या 15 जागांसाठी आज मतदान होत आहे. सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात झाली आहे. काँग्रेस-जनता दलाचे संयुक्त सरकार 17 आमदारांच्या बंडामुळे पडले होते. या आमदारांनी राजीनामे देत या सरकारचा पाठिंबा काढून घेतला. या आमदारांना तत्कालीन विधानसभा अध्यक्षांनी अपात्र ठरविले होते. आमदार अपात्र ठरल्याने रिक्त झालेल्या 15 मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक होत आहे. सत्ताधारी भाजपसाठी ही पोटनिवडणूक सर्वात जास्त महत्त्वाची असून, किमान सहा जागा जिंकल्याशिवाय येडियुरप्पा सरकार टिकू शकणार नाही. त्यामुळे ही पोटनिवडणूक येडियुरप्पा सरकारसाठी अतिशय महत्वाची आहे. बेळगाव जिल्ह्यात तीन मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून बेळगावसह इतर मतदान केंद्रांवर ज्यादा पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. मतदान केंद्रांवर नागरिकांसाठी पाण्याची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे.

बेळगाव जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये गोकाक, कागवाड आणि अथणी मतदारसंघांमध्ये मतदानाला सुरुवात झाली आहे. या मतदान केंद्रबाहेर पोलिसांची कुमक तैनात करण्यात आली आहे. अथणी आणि कागवाड इथे दोन पक्षांमध्ये चुरशीची लढत तर गोकाकमध्ये तिरंगी लढत पाहायला मिळत आहे.

बेळगाव जिल्ह्यात 28 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. भाजपच्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी कर्नाटकची ही विधानसभा पोटनिवडणूक जिंकण जास्त महत्त्वाचं असणार आहे. मतदानाच्या ठिकाणी कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. कर्नाटकात गुरुवारी एकूण सहा लाख 45 हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. या सर्व 15 जागांची मतमोजणी 9 डिसंबरला होणार आहे. मुख्यमंत्री बीएस येडीयुरप्पा यांचे भवितव्य ठरवणारी पोटनिवडणूक असल्यानं भाजपच्या हातात कर्नाटक राहणार की ह्या राज्यातूनही कमळ हद्दपार होणार हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे. महाराष्ट्रातील बदलेल्या सत्ता समीकरणाचा प्रभावही कर्नाटकात होतो का हे पाहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

-------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------

Published by: Kranti Kanetkar
First published: December 5, 2019, 8:07 AM IST
Tags: karnataka

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading