हुश्श! वुहानहून आलेल्या 200 भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह; 17 दिवस वेगळं ठेवल्यानंतर अखेर सोडलं घरी

हुश्श!  वुहानहून आलेल्या 200 भारतीयांची टेस्ट निगेटिव्ह; 17 दिवस वेगळं ठेवल्यानंतर अखेर सोडलं घरी

कोरोनाची अंतिम चाचणी झाल्यानंतर आयटीबीपीच्या केंद्रातील सर्व 406 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यानंतर पहिल्या टप्प्यात 200 जणांना सोडण्यात आलं.

  • Share this:

नवी दिल्ली, 17 फेब्रुवारी : दोन वर्षांची इनाया भंडारी इंडो-तिबेटियन बॉर्डर पोलिस मधील जवानांसोबत खेळण्यात मग्न आहे. तिचा वेळ जवानांशी खेळण्यात आणि त्यांना सॅल्युट करण्यात जात आहे. असे असताना तिच्या पालकांना मात्र घरी जाण्याची घाई आहे. इनायाचे वडील धीरेन हे चीनमध्ये योगा प्रशिक्षक आहेत. त्यांचे संपुर्ण कुटुंब वुहानमधून हलवलं आहे आणि गेल्या 17 दिवसांपासून आयटीबीपीच्या सुविधा केंद्रात ते राहत आहेत. आता त्यांना घरी जाण्याची परवानगी मिळाली आहे. चीनमध्ये कोरोनाचा धोका समोर आल्यानंतर त्यांना भारतीय दुतावासाने आयटीबीपीच्या शिबिरात ठेवलं होतं. सर्व वैद्यकीय प्रक्रिया पार पडल्यानंतर त्यांच्यासह 200 जणांना कोरोनाचा धोका नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर घरी जाण्यास परवानगी मिळाली आहे.

याबद्दल धीरेन यांनी भारतीय दुतावासाचे आभार मानले आहेत. चीनमधून त्यांना हलवलं आणि त्यांची काळजी घेतली. पण त्याआधी चीनमधील परिस्थितीचे वर्णन फार भीतीदायक होतं असंही त्यांनी सांगितलं. लहान मुल सोबत असतानाचा तो काळ फारचं कठीण होता. आम्हाला तिची फार काळजी होती. 23 जानेवारी पासून तिथं सर्व काही ठप्प होतं. मेट्रो, एअरपोर्ट, काही लहान दुकानं सुरु होती जिथं काही खाद्यपदार्थ मिळायचे असं धीरेन यांनी सांगितले.

आयटीबीपीच्या शिबिरात राहिलेल्या काश्मिरी विद्यार्थीनी नौशीनने सांगितलं की, आमचे पाकिस्तान, सुदानसह आफ्रिकन देशातही मित्र आहेत. ते अजुनही त्यांच्या कॅम्पसमध्ये आहेत. चीनमधील मित्रांनी तिथली परिस्थिती किती बिकट आहे ते सांगितले. तिथं बाहेर जाण्यास मनाई आहे. मेस सुरु होती पण आमचं खाणं रुमच्या बाहेर असायचं. हे खूपच भयानक होतं. भारतीय सैन्याने पहिल्यांदा बचावमोहिम सुरु केली असंही नौशीन म्हणाली.

केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन यांनी सांगितले की, आयटीबीपी केंद्रात भारतीयांशी संवाद साधला. चीनमध्ये ज्या शहरात कोरोना व्हायरस पसरला त्या वुहानमधून त्यांना इथं आणण्यात आलं होतं. यातील 200 जणांना घरी जाण्यास सांगितलं आहे. याठिकाणी एकूण 406 लोकांना ठेवण्यात आलं होतं. यात मालदीवच्या 7 जणांचा समावेश आहे. त्यांना एअर इंडियाच्या विमानाने वुहानमधून आणण्यात आलं होतं.

वाचा : Coronavirus : महाराष्ट्रात 5 जण रुग्णालयात निरीक्षणाखाली, तुम्ही अशी घ्या काळजी

कोरोनाची अंतिम चाचणी झाल्यानंतर केंद्रातील सर्व 406 लोकांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. यानंतर पहिल्या टप्प्यात 200 जणांना सोडण्यात आलं. रात्रीपर्यंत ते जातील अशी आशा आहे. उरलेल्या लोकांना मंगळवारी किंवा त्यानंतर पुढच्या दिवसात सोडण्यात येईल अशी माहिती आयटीबीपीच्या प्रवक्त्यांनी दिली.

वाचा : कोरोनाचा उद्रेक! आतापर्यंत 1600 जणांचा मृत्यू, 68 हजार बाधित

First published: February 17, 2020, 10:01 PM IST

ताज्या बातम्या