मुंबई, 27 जानेवारी : जगात अशी अनेक फळं आहेत, जी सर्वांना खूप आवडतात आणि ती बाजारात अगदी कमी किमतीत मिळतात. द्राक्ष हेदेखील त्या फळांपैकीच एक होय. उन्हाळ्यात आवडीनं द्राक्षं खाल्ली जातात. 'द्राक्षांची चव आंबट' अशी एक म्हण आहे. याचा अर्थ एखादं काम एखाद्याच्या आवाक्यात नसेल तर तो त्याचा कमकुवतपणा सांगण्याऐवजी काम कसं चुकीचं आहे हे सांगतो; पण आज आम्ही तुम्हाला अशा द्राक्षांविषयी सांगणार आहोत, ती खरेदी करणं प्रत्येकाच्या आवाक्यात नाही. या द्राक्षांची किंमत ऐकल्यावर तुम्ही खरंच म्हणाल, की ही द्राक्षं आंबट आहेत.
ऑडिटी सेंट्रल न्यूज वेबसाइटच्या माहितीनुसार, रुबी रोमन नावाची द्राक्षं जगातली सर्वांत महागडी आहेत. जपानमधल्या इशिकावामध्ये या द्राक्षांचं उत्पादन होतं. या द्राक्षांच्या उत्पादनाची कथा खूपच रंजक आहे. 1995मध्ये तिथल्या शेतकऱ्यांनी संशोधनाच्या माध्यमातून लाल द्राक्षजातींचं उत्पादन वाढवण्यासाठी मदत करा अशी विनंती संशोधकांना केली. प्रयोगासाठी 400 द्राक्षवेलींची लागवड करण्यात आली. त्यातून पुढच्या दोन वर्षांत केवळ चारच वेली लाल द्राक्षांच्या झाल्या. यात फक्त एकाच जातीच्या वेलीपासून अपेक्षेप्रमाणे पीक आलं. त्यानंतर 14 वर्षं संशोधकांनी संशोधन करून या द्राक्षांचा आकार बदलला आणि त्यांना लाल रंग प्राप्त करून दिला. तेव्हापासून या द्राक्षांना रुबी रोमन असं म्हटलं जाऊ लागलं. काही जण या द्राक्षांना इशिकावाचा खजिना असंही म्हणतात. शेतकऱ्यांनी 300हून अधिक नावांमधून या नावाची निवड केली आहे.
हेही वाचा - Cardamom Benefits : छोटीशी वेलची करेल कॅन्सरपासून बचाव, वाचा इतर अद्भुत फायदे
एका घडाची किंमत आहे 73 हजार रुपये
2008मध्ये ही द्राक्षं बाजारात दाखल झाली होती. त्या वेळी, 700 ग्रॅम वजनाच्या द्राक्षघडाची किंमत 73 हजार रुपये होती. या किमतीत तुम्ही एखादी बाइक खरेदी करू शकाल. आठ वर्षांनंतर एक घड 8 लाख रुपयांना विकला गेला आणि ही किंमत ऐकून एकच खळबळ उडाली. या हिशेबाने विचार केला तर एका द्राक्षमण्याची किंमत 20 हजार रुपयांपेक्षा अधिक होती.
या श्रेणीत येण्यासाठी निश्चित केली गेली विशेष मानकं
रुबी रोमन द्राक्षं या स्थितीपर्यंत पोहोचण्यासाठी द्राक्षांचं स्वरूप, आकार आणि रंग यावर आधारित अनेक निकष आहेत. यात एका द्राक्षाचं वजन 20 ग्रॅमपर्यंत असावं आणि त्यात साखरेची पातळी 18 टक्क्यांपर्यंत असावी, असा निकष होता. रुबी रोमन द्राक्षांचा प्रीमियम वर्गदेखील आहे जो सामान्य द्राक्षांपेक्षा अधिक महाग दराने विकला जातो. 2010मध्ये प्रीमियम ठरण्यासाठी या द्राक्षाचे केवळ 4 घड पात्र ठरले होते.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.