Home /News /national /

'गुन्हेगाराला मारून टाकल्याने बलात्कार संपणार नाहीत', मिलिंद सोमणच्या ट्वीटवर महिलांनी व्यक्त केला संताप

'गुन्हेगाराला मारून टाकल्याने बलात्कार संपणार नाहीत', मिलिंद सोमणच्या ट्वीटवर महिलांनी व्यक्त केला संताप

उत्तर प्रदेशमधील हाथरस याठिकाणी घडलेल्या 19 वर्षीय मुलीच्या बलात्काराच्या घटनेमुळे संपूर्ण देश पुन्हा एकदा हादरला आहे. याबाबत सर्वच स्तरातून संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत.

    मुंबई, 01 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस येथे 19 वर्षीय तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेनंतर देशभरात संतापाचं वातावरण असून चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. या मुलीच्या मृत्यूनंतर पोलिसांनी कुटुंबीयांचा विरोध झुगारत तिच्या मृतदेहावर रात्रीच अंत्यसंस्कार केले. या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये प्रचंड जनक्षोभ उसळला आहे.  मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी कुटुंबियांना 25 लाख रुपये नुकसान भरपाई आणि कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचं आश्वासन दिलं आहे. तसंच या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT देखील स्थापन करण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सोशल मीडियावर देखील संतापजनक प्रतिक्रिया उमटत आहेत. अनेक कलाकार, सिलिब्रिटी, नेतेमंडळी यांनी या घटनेचा निषेध करत पीडितेच्या कुटुंबाला न्याय मिळावा अशी मागणी केली आहे. बॉलिवूड अभिनेता आणि मॉडेल मिलिंद सोमणने (Milind Soman) याने देखील twitter वर एक पोस्ट शेअर करत आरोपींना शिक्षा देण्याची मागणी केली आहे.  त्याने  "Kill rapists in public,"असं ट्विट करत ही मागणी केली आहे. मिलिंद सोमणचं हे ट्वीट व्हायरल झाल्यानंतर मोठ्या प्रमाणात महिलांनी त्यावर कमेंट केल्या आहेत. बलात्कऱ्याला मृत्यूदंड देणे हा यावरील उपाय ठरू शकत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. यामध्ये अनेकांनी म्हटलं, दिल्लीतील निर्भया प्रकरणानंतर देखील देशभरात मोठ्या प्रमाणात बलात्काराच्या घटना घडत आहेत. हैदराबादमध्ये झालेल्या मुलीवरील बलात्कार प्रकारानंतर पोलिसांनी आरोपीचं एन्काउंटर केलं होतं. पण त्यानंतर देखील गुन्हेगारांच्या मनांत भीती नसल्याचं एका महिलेनं आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. ही मागणी चुकीची असल्याचं या महिलांनी मिलिंद सोमण याला दिलेल्या उत्तरावरून दिसून येत आहे. दरम्यान, या प्रकरणात पीडितेचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी आई वडिलांचे काहीही न ऐकता परस्पर अंत्यसंस्कार केले, असा आरोप पोलिसांवर केला जात आहे. आपल्या मुलीवर नियमांप्रमाणे अंत्यसंस्कार व्हावेत, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. तिचा मृतदेह घरी न्यावा, अशी कुटुंबीयांची इच्छा होती. सुमारे 200 च्या आसपास असलेल्या पोलिसांनी पीडितेच्या कुटुंबीयांची मागणी फेटाळत पहाटे 3 वाजता मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी नेला. त्याचबरोबर कुटुंबातील कोणत्याही सदस्याला अंत्यविधी ज्या ठिकाणी करण्यात आला तिथं येण्यास बंदी घालण्यात आली होती. ज्यावेळी या पीडित मुलीचा मृतदेह अंत्यसंस्कार करण्यासाठी हाथरसमध्ये नेण्यात आला तेव्हा या मुलीचा भाऊ आणि कुटुंबीय दिल्लीमध्ये होते, अशी माहिती मुलीच्या काकांनी न्यूज 18 ला दिली आहे.
    Published by:Janhavi Bhatkar
    First published:

    Tags: India, Rape cases, Uttar pradesh, Uttar pradesh news

    पुढील बातम्या