मराठी बातम्या /बातम्या /देश /Viral Video: पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची 'मुन्नी'; कुटुंबाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

Viral Video: पाकिस्तानात 'बजरंगी भाईजान'ची वाट पाहतेय भारताची 'मुन्नी'; कुटुंबाची परराष्ट्र मंत्रालयाकडे धाव

बुशराने पकिस्तानहून व्हिडीओ केलं आहे

बुशराने पकिस्तानहून व्हिडीओ केलं आहे

बुरसाला भारतात आणण्यासाठी तिच्या भावांनी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

    मुंबई,  23 डिसेंबर:  बजरंगी भाईजान ही सलमान खानची सुपरहिट फिल्म तुम्ही पाहिली असेलच. या चित्रपटात मुन्नीला तिच्या घरी सोडण्यासाठी बजरंग भक्त पवन पाकिस्तान गाठतो. ही त्या चित्रपटाची कथा आहे. प्रत्यक्षात पाकिस्तानात (Pakistan) एक अशी महिला आहे, जी गेल्या अनेक वर्षांपासून भारतात येण्याची वाट पाहतेय. त्या महिलेचं नाव बुशरा उर्फ मुन्नी असं आहे. या महिलेचा व्हिडिओ सोशल माध्यमांवर (Viral video of Bursa from Pakistan) खूप व्हायरल झाला आहे. ती भारतीय नागरिक असून पाकिस्तान अडकल्याचं त्यातून समोर आलं आहे. आपण पाकिस्तानात कसे पोहोचलो, याबद्दल या व्हिडिओमध्ये तिने सांगितलं आहे. हा व्हिडिओ तिच्या कुटुबीयांपर्यंत पोहोचला असून, ते तिला भेटण्यासाठी आतुर झाले आहेत. बुरसाला भारतात आणण्यासाठी तिच्या भावांनी प्रशासन आणि परराष्ट्र मंत्रालयाकडे मदत मागितली आहे.

    बुरसा ही संभळमधल्या सरायतरीन भागातील हिझडान येथील रहिवासी असलेल्या मोहम्मद छिद्दन यांची मुलगी आहे. 40 वर्षांपूर्वी 1981 साली तिच्या मावशीचे यजमान काका तिला दिल्लीला घेऊन गेले होते. तिथे त्यांनी तिला काही जणांना विकून टाकलं. त्यांच्या तावडीतून तिने आपली कशीबशी सुटका करून घेतली आणि ती हरियाणाला पोहोचली; पण तिथेही दुसऱ्या मानवी तस्करी टोळीने तिला पकडलं. या टोळीने मुन्नीला सीमा ओलांडून पाकिस्तानात नेलं आणि कराचीत तिचं एका व्यक्तीशी लग्न लावून दिलं. यानंतर तिचं नाव बुशरा असं ठेवण्यात आलं. परिस्थितीचा स्वीकार करत मुन्नी उर्फ बुशरा पाकिस्तानातच स्थायिक झाली; पण आपल्या देशाचा तिला विसर पडला नाही.

    आपण पाकिस्तानात आहोत, हे आपल्या कुटुंबाला कळावं, त्यांच्यापर्यंत ही माहिती पोहोचावी यासाठी तिने भरपूर प्रयत्न केले. यासाठी तिला एका महिला पत्रकाराने मदत केली. काही दिवसांपूर्वी मुन्नी उर्फ बुशराने आपली कहाणी एका पाकिस्तानी महिला पत्रकाराला सांगितली. याचा संपूर्ण व्हिडिओ रेकॉर्ड करून संबंधित महिला पत्रकाराने तो सोशल मीडियावर पोस्ट केला. या व्हिडिओमध्ये बुशराने आपल्या कुटुंबाविषयी सांगितलं आणि सरायतरीनमधल्या घराचा पत्ता सांगितला. हा व्हिडिओ एवढा व्हायरल झाला, की तो तिच्या भावापर्यंत पोहोचला आहे.

    बुशराला तीन भाऊ आहेत. इस्लाम, अक्रम आणि बहार आलम अशी तिच्या भावांची नावं आहेत. आपली बहीण जिवंत असून पाकिस्तानात असल्याची माहिती मिळाल्यानंतर तिला भेटण्यासाठी ते आतुर झाले आहेत. सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या बुशराच्या नंबरवर त्यांनी व्हिडिओ कॉल केला. तब्बल चाळीस वर्षांनंतर एकमेकांना पाहून त्यांना भावना अनावर झाल्या. आता तिचे भाऊ बुशराला भारतात आणण्याचा विचार करत आहेत. यासाठी प्रशासनाला निवेदन देण्याबरोबरच त्यांनी परराष्ट्र मंत्रालयाकडे या प्रकरणी मदत मागितली आहे. 40 वर्षं पाकिस्तानात वास्तव्य केल्यानंतरही बुशराचं भारतावरचं प्रेम आणि नातेवाईकांच्या भेटीची आशा कायम आहे.

    First published:
    top videos

      Tags: India, Live video viral, Pakistan