...आणि वाघा सीमेवर 60 तासांची प्रतिक्षा संपली

...आणि वाघा सीमेवर 60 तासांची प्रतिक्षा संपली

अभिनंदनच्या स्वागतासाठी हजारो लोक तिरंगा घेऊन वाघा सीमेवर पोहोचले होते. भारत माता की जय या घोषणांनी सर्व परिसर दणाणून गेला होता.

  • Share this:

वाघा सीमा (पंजाब) 1 मार्च : दोन दिवस पाकिस्तानच्या ताब्यात राहिल्यानंतर विंग कमांडर अभिनंदन वर्तमानने शुक्रवारी सायंकाळी वाघा सीमेवरून भारतात प्रवेश केला. हवाई दलाचे अधिकारी त्याला घ्यायला सीमेवर गेले होते. युद्ध कैदी जेव्हा मायदेशी परत येतो तेव्हा त्याला स्वीकारण्याचे लष्कराचे काही नियम आहेत त्याचं पालन करत अभिनंदनचं स्वागत करण्यात आलं. 60 तासानंतर अभिनंदन भारतात परतला.

सायंकाळी चार वाजता अभिनंदनला भारताला सोपविण्यात येणार होतं. मात्र ही प्रक्रिया लांबत गेली. रात्री 9.15 च्या सुमारात त्याला भारतीय अधिकाऱ्यांच्या स्वाधीन करण्यात आलं. लष्करी शिस्तित अभिनंदन उभा होता. त्याच्यासोबत काही पाकिस्तानी अधिकारी आणि भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी उपस्थित होते.

गुरुवारी त्याला भारताच्या अधिकाऱ्यांना सोपविण्यात आलं होतं. त्यानंतर कागदपत्रांची पुर्तता झाल्यानंतर त्याला वाघा सीमेवर आणण्यात आलं. अभिनंदनला विशेष विमानाने आणण्याची परवानगी द्यावी अशी मागणी भारताने केली होती मात्र ती मान्य करण्यात आली नाही. वाघा सीमेवर अभिनंदनला घ्यायला त्याचे कुटुंबीयही आले होते.

वाघा सीमेवर दररोज होणारा 'बीटिंग द रिट्रीट' हा कार्यक्रम आज रद्द करण्यात आला. त्यामुळे हजारो लोक अभिनंदनच्या स्वागताला थांबले होते.  ढोल ताशे आणि तिरंगा ध्वज घेतलेल्या हजारो लोकांनी त्यांचं स्वागत केले आणि भारत माती की जय च्या घोषणांनी सर्व परिसर दणाणून सोडला. कन्याकुमारी इथं झालेल्या जाहीर सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदनच्या शौर्याचं कौतुक केल.

सीमेवर आल्यानंतर त्याची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यानंतर हवाई दलाच्या अधिकाऱ्यांनी त्याचा ताबा घेतला. हवाईदलाच्या गुप्तचर विभागाचे लोक आता अभिनंदनची चौकशी करणार आहेत. त्यानंतर त्याला केव्हा कामावर परत घ्यायचं याचा निर्णय हवाई दल घेणार आहे.

रावळपींडीहून अभिनंदनला लाहोरला आणण्यात आलं आणि तिथून त्याला वाघा सीमेवर आणण्यात आलं. ही सगळी प्रक्रिया रेड क्रॉस या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या मदतीने पार पाडली जाते.

गेल्या 24 तासात नेमकं काय घडलं?

बुधवारी सकाळी पाकिस्तानच्या F-16 लढाऊ विमानांनी जम्मू आणि काश्मीरमध्ये भारतीय हद्दीत प्रवेश केला.

पाकिस्तानच्या या विमानांना पिटाळण्यासाठी मिग-21 या भारतीय विमानांचे पायलट असलेल्या अभिनंदन यांनी F-16 चा पाठलाग केला.

पाठलाग करताना त्यांनी पाकिस्तानच्या हद्दीत F-16 ला पाडलं मात्र त्यांच्या विमानात बिघाड झाला.

त्यानंतर त्यांनी पॅरेशुटच्या मदतीने खाली उडी घेतली आणि ते पाकिस्तानच्या हद्दीत उतरले.

पाकिस्तानच्या किल्लान या गावात अभिनंदन यांना 27 फेब्रुवारीला पाकिस्तानी सैन्याने ताब्यात घेतलं.

पाकिस्तानच्या माध्यमांनी त्याचे फोटो आणि व्हीडीओ व्हायरल केले.

संध्याकाळी भारताच्या परराष्ट्रमंत्रालयाच्या प्रवक्त्यांनी भारताचा एक पायलट बेपत्ता असल्याचं मान्य केलं.

नंतर जगभरातून पाकिस्तानवर दबाव निर्माण झाला. भारतानेही मुत्सद्देगिरीच्या पातळीवर हा विषय हाताळत पाकिस्तानवर मात केली

आणि तणाव निवळण्यासाठी अखेर पाकिस्तानला अभिनंदन वर्तमान याला सोडाव लागलं.

पुन्हा विमान उडविण्यासाठी लागतील तीन महिने

विंग कमांडर अभिनंदन यांना भारतात आल्यानंतर विमान उडवण्याकरता किमान 3 महिने किंवा त्यापेक्षा जास्त काळ लागू शकतो. त्यासाठी काही नियम आहेत. हवाई दलाच्या नियमानुसार विंग कमांडर अभिनंदन यांचं मेडिकल चेकअप करण्यात येईल. विमानातून उडी मारताना मणक्याला मार लागण्याची शक्यता जास्त असते.

त्यामुळे सुरुवातीला त्याबाबत मेडिकल चेकअप केलं जाईल. या सर्व वैद्यकीय चाचण्यांमध्ये अभिनंदन पास झाले की त्यानंतर त्यांना विमान उडवण्यासाठी परवानगी दिली जाईल. पण, फिटनेस चाचणीमध्ये फेल झाल्यास अभिनंदन यांची दुसऱ्या पदावर किंवा विमानावर बदली केली जाईल. भारतीय हवाई दलाच्या नियमांनुसार या साऱ्या गोष्टी पार पाडल्या जातात.

INSIDE STORY

27 फेब्रुवारीला अभिनंदन पाकिस्तानच्या ताब्यात सापडल्यानंतर भारताचे 'मिशन अभिनंदन' सुरू झालं. जिनिव्हा करारानुसार पकिस्तानने भारताला औपचारिकपणे अभिनंदन ताब्यात असल्याची माहिती दिली. नंतर भारताने त्याला तातडीन सोडा अशी विनंती पाकिस्तानला केली. त्यानंतर आंतरराष्ट्रीय समुदायाला भारताने सर्व माहिती द्यायला सुरुवात केली.

भारताने अमेरिक, ब्रिटन, फ्रांन्स आणि सऊदी या देशांना माहिती दिली. त्या सर्व देशांनी अभिनंदनची सुटका करावी यासाठी पाकिस्तानवर दबाव आणला. त्यानंतर भारताने सर्व सार्क देशांनाची विश्वासात घेतलं. त्यांनीही पाकिस्तानवर दबाव आणला.

अमेरिका, ब्रिटन आणि सऊदी अरेबीयाने पाकिस्तानला सांगितले की, अभिनंदनला सोडलं नाही तर भारताला शांत करणे कठिण जाईल आणि सीमेवर तणाव वाढेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय दबाव वाढत असल्याने शेवटी तणाव निवळण्यासाठी पंतप्रधान इम्रान खान यांनी अभिनंदनच्या सुटकेची घोषणा केली.

Special Report : अभिनंदन यांची विनाशर्त सुटका करणारा भारताचा 'जेम्स बॉन्ड'

First published: March 1, 2019, 9:24 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading