अभिनंदन परतला पण त्या 54 जणांचं काय ?

पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या युद्धकैद्यांमध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना 'मिसिंग 54' असं म्हटलं जातं.

News18 Lokmat | Updated On: Mar 1, 2019 04:52 PM IST

अभिनंदन परतला पण त्या 54 जणांचं काय ?

नवी दिल्ली 1 मार्च  :पाकिस्तानच्या ताब्यात असलेला भारताचा विंग कमांडर अभिनंदन भारतात परतला आहे. पण 1971 च्या युद्धात पाकिस्तानच्या ताब्यात गेलेले 54  जण अजूनही बेपत्ता आहेत. त्यांचं नेमकं काय झालं हे कुणालाही कळू शकलेलं नाही. हे युद्ध भारताने जिंकलं पण आपले जवान आणि अधिकारी मात्र आपण गमावून बसलो.

पाकिस्तानच्या ताब्यात गेलेल्या युद्धकैद्यांमध्ये भारतीय लष्कर आणि हवाई दलाचे जवान, अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या सगळ्यांना 'मिसिंग 54' असं म्हटलं जातं. एक लेफ्टनंट, आठ  कॅप्टन्स यांच्यासह ३० जण लष्करामधले आहेत तर २४ जण हवाई दलातले आहेत.

पाकिस्तानमधल्या वेगवेगळ्या तुरुंगांमध्ये हे सर्वजण युद्धकैदी बनून खितपत पडले, असं म्हटलं जातं. यातले काहीजण आता हयात असण्याचीही शक्यता नाही. पाकिस्तानने मात्र हे 54 जण आपल्याकडे नाहीतच, अशी बतावणी केली. त्यामुळे त्यांचं पुढे काय झालं हे कळू शकलं नाही.

या लष्करी जवानांच्या आणि अधिकाऱ्यांच्या कुटुंबीयांनी याबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवर दाद मागितली आहे. पण इतक्या वर्षांनंतरही हे जवान आणि अधिकारी त्यांच्या कुटुंबीयांना भेटू शकलेले नाही.  1189 मध्ये पाकिस्तानने हे 54 जण आपल्याकडे असल्याचा पूर्णपणे इन्कार केला. पण त्यानंतर पाकिस्तानच्या त्यावेळच्या पंतप्रधान बेनझीर भुत्तो यांनी हे युद्धकैदी पाकिस्तानातच आहेत, असं सांगितलं. भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी आणि बेनझीर भुत्तो यांच्या

भेटीतही हा मुद्दा उपस्थित झाला होता. या सगळ्यांची सुटका करण्यात येईल, असं आश्वासन त्यावेळी भुत्तो यांनी दिलं होतं. पण पुढे काहीच झालं नाही. याउलट 1971 च्या युद्धातल्या सुमारे 90 हजार युद्धकैद्यांना भारताने सोडून दिलं आहे. भारताने सिमला कराराच्या अटी पाळून या सगळ्यांची मुक्तता केली.

Loading...

बांगलादेश युद्धानंतर लगेचच 1972 मध्ये 'टाईम' मासिकामध्ये एक फोटो प्रसिद्ध झाला होता. या फोटोत या युद्धकैद्यांपैकी एक जण गजाआड बसलेला दाखवण्यात आला होता. तो मरण पावला, अशी त्याच्या कुटुंबीयांची समजूत होती. पण त्या फोटोवरून त्यांना तो जिवंत असल्याचं कळलं.

लाहोरमधल्या कोट लखपत तुरुंगात भारताच्या या युद्धकैद्यांना ठेवलं आहे, असं पत्रकार व्हिक्टोरिया स्कोफिल्ड यांनीही लिहिलं होतं.   पाकिस्तानच्या कैदेत असणाऱ्या या युद्धकैद्यांपैकी काही पायलट्सच्या मुलाखतीही घेण्यात आल्या. एका अमेरिकन जनरलने त्यांच्याशी बातचीत केली होती. या वैमानिकांनी रशियामध्ये विमान उड्डाणाचं प्रशिक्षण घेतलं होतं. त्यामुळे अमेरिकन जनरलना त्यांच्याकडून काही माहिती हवी होती.

आता मात्र या युद्धकैद्यांपैकी कुणी जिवंत नसावं, असंच सगळ्यांनी गृहित धरलं आहे. पाकिस्तान जोपर्यंत त्यांच्याबद्दल काहीच माहिती देत नाही तोपर्यंत आपण या सगळ्यांना पाकिस्तानच्या कैदेत गमावून बसलो, असंच म्हणावं लागेल.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Mar 1, 2019 04:50 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...