नवी दिल्ली 22 मार्च : कोरोना लस (Corona Vaccine) घेतल्यास रोजा तुटणार का? असा प्रश्न पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या रमझानच्या आधी मुस्लिमांसमोर उपस्थित झाला आहे. मुस्लिमांमध्ये या गोष्टीबाबत असा समज आहे, की रमझानच्या काळात कोरोना लस घेतल्यास त्यांचा रोजा तुटेल (Covid shot break Ramadan fast). मात्र, सौदी अरेबियातील (Saudi Arabia) ग्रँड मुफ्ती (Grand Mufti) यांनी हा गैरसमज दूर करण्याचा प्रयत्न केला आहे. मुफ्ती म्हणाले, की रोजा असताना लस घेतल्यास रोजा तुटणार नाही.
अरब न्यूजच्या वृत्तानुसार, रमझानच्या आधी सौदीचे ग्रँड मुफ्ती शेख अब्दुल अजीज अल-अशेख (Sheikh Abdul Aziz Al-Asheikh) यांनी म्हटलं, की रोजा करताना कोरोनाची लस घेण्यात चुकीचं काहीच नाही. यामुळे रोजा तुटणार नाही. पुढे ते म्हणाले, की या लसीमुळे रोजा असलेल्या व्यक्तीचा रोजा तुटणार नाही. कारण, याला फळांचा रस मानलं जात नाही. लस हे खाद्यपदार्थ समजले जात नाही. ही लस शरिराच्या आतमध्ये दिली जात असल्यानं यामुळे रोजा तुटणार नाही.
मुफ्ती यांनी दिलेल्या या उत्तरामुळे रोजा आणि लसीबद्दल मनात शंका असणाऱ्या अनेकांना दिलासा मिळाला आहे. यंदा रमजानचा महिना १२ किंवा १३ एप्रिलपासून होण्याची शक्यता आहे. हा महिना खरच कधी सुरू होणार हे चंद्रावरच ठरणार आहे. दुसरीकडे कोरोना लसीमध्ये डुकाराच्या मांसाचा वापर केला असल्याचा दावाही काहींनी केल्यानं या गोष्टीमुळेही मुस्लीम चिंतेत होते. मात्र, आता एस्ट्राजेनेकानं हे स्पष्ट केलं आहे, की त्यांच्या कोरोना लसीमध्ये याचा अजिबातही वापर केला गेला नाही.
जगातील सर्वाधिक मुस्लीम लोकसंख्या असलेल्या इंडोनेशियानं लसीमध्ये डुकराचं मांस असल्याचा दावा केला होता. उलेम काऊंसिलनं आपल्या वेबसाईटवरुन हा दावा करत याचा वापर न करण्याचं आवाहन केलं होतं. काऊंसिलच्या म्हणण्यानुसार यात डुकराच्या स्वादुपिंडीतील एका घटकाचा वापर करण्यात आलेला आहे. यामुळे या लसीची वापर न करण्याचं आवाहन त्यांनी केलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccine, Muslim, Ramdan