चंदीगड, 05 फेब्रुवारी: हरियाणातील फरिदाबादमधील एका महिलेने आपला प्रियकर आणि इतर तिघांसोबत मिळून नवऱ्याचा खून केला आणि त्याचा मृतदेह त्याच्याच घरातील बॉक्स बेडमध्ये लपवून ठेवला. आठ दिवसांनी हा मृतदेह नाल्यात टाकण्यात आला. पोलिसांना मृतदेह मिळाल्यावर चौकशी दरम्यान हा सर्व प्रकार उघड झाला, अशी माहिती फरिदाबाद पोलिसांनी दिली.
आरोपी महिलेचा पती दिनेश याला तिने, तिचा प्रियकर नितीन आणि इतर तिघांनी मिळून 11 आणि 12 जानेवारीच्या रात्री लाठीने वार करून ठार मारलं. त्यानंतर संशय येऊ नये म्हणून सैनिक कॉलनीतील त्याच्याच घरात असणाऱ्या बॉक्स बेडमध्ये दिनेशचा मृतदेह लपवून ठेवला. आठ दिवसांनी त्याठिकाणाहून वास येऊ लागल्याने त्यांनी तो मृतदेह डाबुआ कॉलनीतील नाल्यात फेकून दिला. इंडियन एक्सप्रेसने याबाबत वृत्त दिलं आहे.
28 जानेवारीला पोलिसांना हा मृतदेह सापडल्यावर त्यांनी त्याची ओळख पटवण्यासाठी पत्नीला याबाबत विचारणा केली. पहिल्यांदा तिने ओळख पटवली नाही पण दिनेशच्या मित्राने मृतदेहाची ओळख पटवल्यानंतर पोलिसांनी त्याच्या पत्नीची कसून चौकशी केली.
टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार एकूण चार आरोपींपैकी एक त्या महिलेचा काका असल्याचं उघडकीस आलं आहे. दिनेश या महिलेच्या आणि तिच्या प्रियकराच्या वाटेत आडवा येत असल्यानेच त्यांनी ही हत्या केल्याचं या अहवालात म्हटलं आहे. नितीनने आरोपींपैकी एकाला 41 हजार रुपये देऊन मृतदेह नाल्यात टाकण्यास सांगितलं होतं त्याप्रमाणे त्याने केलं. पोलिसांनी दिनेशला मारण्यासाठी वापरण्यात आलेला दांडुका ताब्यात घेतला आहे. त्याचप्रमाणे पोलिसांनी त्या महिलेला अटक केली असून अन्य चार आरोपींचा तपास करत आहेत.