लखनऊ 25 मार्च : लोकसभा निवडणुकीत सर्वच पक्ष जाती-पातींच्या विरोधात बोलत असले तरी उमेदवार निवडताना जात हा फॅक्टर बघितलाच जातो हे सत्य आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तरप्रदेशात तर निवडणुकीत जात फॅक्टर सर्वात महत्त्वाचा घटक आहे. काँग्रेस या निवडणुकीत याचा आधार घेत 'ब्राम्हण कार्ड' खेळण्याच्या तयारीत आहे.
उत्तरप्रदेशमध्ये ब्राम्हण मतदारांचं प्रमाण मोठं आहे. ठाकूर आणि ब्राम्हण हे कधीकाळी काँग्रेसचे मतदार होते. नंतर मात्र ते भाजपकडे वळले. तर दलित आणि मुस्लिम मतदार समाजवादी पार्टी आणि बसपाकडे गेले. त्यामुळे काँग्रेसला या मोठ्या राज्यात जनाधार राहिलेला नाही. हा जनाधार मिळविण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.
प्रियंका गांधी यांनी उत्तरप्रदेशची जबाबदारी घेतल्यानंतर ब्राम्हण मतदार काँग्रेसकडे वळतील अशी शक्यताही व्यक्त करण्यात येत होती. आता भाजपचा गढ असलेल्या लखनऊ या मतदारसंघात काँग्रेस जितिन प्रसाद यांना उमेदवारी देण्याच्या विचारात आहे. जितिन हे ब्राम्हण कुटुंबातले असून त्यांचे वडिल जितेंद्र प्रसाद हे राज्यातले काँग्रेसचे दिग्गज नेते होते. केंद्रात त्यांनी दिर्घकाळ मंत्रीपद भूषवलं होतं आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाची निवडणूकही लढवली होती.
ब्राम्हण उमेदवार दिल्यास त्याचा फायदा होईल असं काँग्रेसला वाटतं. लखनऊमध्ये 19 लाख मतदार आहेत. त्यात सवर्णांचा वाटा 33 टक्के, ब्राम्हण 14.5, अनुसूचित जाती 19, मुस्लिम 17, अतिमागास जाती 10 टक्के असं मतदाराचं प्रमाण आहे.
विधासभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे शिला दीक्षित यांना उत्तरप्रदेशच्या मुख्यमंत्रीपदासाठी प्रोजेक्ट केलं होतं. दीक्षित या ब्राम्हण असल्यानेच राजकीय डावपेचांमुळे त्यांना दिल्लीतून उत्तरप्रदेशात आणलं होतं. मात्र त्याचा परिणाम झाला नाही. आता या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचं हे ब्राम्हण कार्ड चालणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.