CAB 2019 : राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली? संजय राऊतांचा खुलासा

CAB 2019 : राज्यसभेत मतदानाच्या वेळी सेना का बाहेर पडली? संजय राऊतांचा खुलासा

संजय राऊत यांनी या विधेयकाला आक्षेप घेत अमित शहांना टोले लगावले होते. मात्र, शेवटी सभागृहातून सभात्याग केल्याने त्याचा थेट फायदा सरकारला झाला.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 डिसेंबर : वादळी चर्चेनंतर अखेर राज्यसभेतही नागरिकत्व सुधारणा विधेयक आज मंजूर झालं. शिवसेनेने सभात्याग केल्याने याचा भाजपला फायदा झाला. विधेयकाच्या बाजूने 125  तर विरोधात 105 एवढी मतं पडली. सेनेनं अशी भूमिका का घेतली यावर सेनेचे खासदार संजय राऊत यांनी खुलासा केला.

व्होट बँक मजबूत करण्यासाठी हा प्रयत्न आहे. शरणार्थी लोकांना मतदानाचा अधिकार देऊ नये, अशी शिवसेनेची ठाम भूमिका आहे. तामिळ हिंदू सुद्धा श्रीलंकेमध्ये अत्याचार सहन करत आहे. त्यांच्याबद्दल कोणतीही भूमिका मोदी सरकारने स्पष्ट केलेली नाही, असा आरोप राऊत यांनी केला.

तसंच , बाहेरून तुम्ही शरणार्थी घेत आहात, पण श्रीनगरमधील काश्मिरी पंडिताबद्दल कोणती भूमिका मांडत नाही. 370 कलम हटवल्यानंतरही काश्मिरी पंडितांना त्यांच्या भूमीत अजूनही जाता येत नाही. याबद्दल सरकारकडे कोणतीही उत्तर नाही. त्यामुळे आम्ही सभागृहातून बाहेर पडलो, असा खुलासा राऊत यांनी केला

शिवसेनेच्या या भूमिकेमुळे महाविकासआघाडीवर काही परिणाम होईल का? असा सवाल केला असता, असा कोणताही परिणाम होणार नाही. आमचा पक्ष हा स्वतंत्र्य आहे. आमची भूमिका आम्ही ठामपणे मांडली आहे, असंही राऊत यांनी स्पष्ट केलं.

नागरिकत्व सुधारणा विधेयक आज राज्यसभेतही मंजूर झालं. या आधी लोकसभेत हे विधेयक मंजूर झालं होतं. मात्र, राज्यसभेत भाजपचं संख्याबळ कमी असल्याने काय होतं त्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. राज्यसभेत आज सहा तासांपेक्षा जास्त तास या विधेयकावर वादळी चर्चा झाली. त्यानंतर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी विरोधकांच्या सर्व आरोप आणि आक्षेपांना सडेतोड उत्तर दिलं. त्यावर अनेकदा वादही झाले. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी या विधेयकाला आक्षेप घेत अमित शहांना टोले लगावले होते. मात्र, शेवटी सभागृहातून सभात्याग केल्याने त्याचा थेट फायदा सरकारला झाला.

लोकसभेत शिवसेनेने विधेयकाच्या बाजूने मतदान केलं होतं. त्यानंतर काँग्रेसने आपली नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेत शिवसेना पाठिंबा देणार नाही, असं म्हटलं होतं. परंतु, सेनेनं वॉकआऊट केलं.  विधेयकाच्या बाजूने 125  तर विरोधात 105 एवढी मतं पडली. हे विधेयक मंजूर झाल्यामुळे सरकारचा मोठा विजय झाल्याचं मानलं जातंय. विरोधी पक्षांनी विधेयकावर 14 प्रस्ताव दिले होते मात्र हे सर्व प्रस्ताव फेटाळले गेले.

आज राज्यसभेत काय झालं?

अमित शहांनी विधेयक मांडल्यानंतर त्यावर प्रदीर्घ चर्चा झाली. काँग्रेस, शिवसेना आणि विरोधी पक्षांच्या सदस्यांनी या प्रश्नावरून मोदी सरकारवर प्रचंड हल्लाबोल केला. काँग्रेसचे गुलाम नबी आझाद, कपील सिब्बल आणि पी. चिदंबरम यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हेतूवरच शंका उपस्थित केली. तर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अमित शहांना तुमच्या देशभक्तीचं प्रमाणपत्र आम्हाला नको असं सांगितलं. या सगळ्या प्रश्नांना अमित शहा यांनी शेवटी सडेतोड उत्तर दिलं. या बिलावरून काँग्रेस आणि काही पक्ष संभ्रम निर्माण करून मुस्लिमांच्या मनात भीती निर्माण केली जात असल्याचा पलटवार त्यांनी काँग्रेसवर केला. तर एका रात्रीत भूमिका का बदलली असा सवाल करत त्यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचाही प्रयत्न केला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Dec 11, 2019 09:47 PM IST

ताज्या बातम्या