अण्णांच्या आंदोलनात फडणवीसांची 'चाणक्य नीती', राहुल-प्रियांकांना 'धोबीपछाड'

अण्णांच्या आंदोलनात फडणवीसांची 'चाणक्य नीती', राहुल-प्रियांकांना 'धोबीपछाड'

अण्णा हजारेंच्या आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल - प्रियांका गांधी यांना धोबीपछाड दिल्याची चर्चा सध्या राळेगणसिद्धी येथे रंगली आहे.

  • Share this:

राळेगणसिद्धी, 8 फेब्रुवारी : लोकपाल आणि शेतकऱ्यांच्या मागण्यांवर ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारेंनी राळेगणसिद्धी येथे उपोषण केले होते. त्यानंतर जवळपास पाच दिवस अण्णांनी मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मागे येणार नाही अशी ठाम भूमिका घेतली होती.

पण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जातीनं लक्ष घालत उपोषण मागे घेण्यासाठी अण्णांचं मन वळवलं. तब्बल सहा तास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राळेगणसिद्धी येथे अण्णांशी चर्चा केली. या प्रदिर्घ चर्चेनंतर काही अटी - शर्तींवर अण्णांनी अखेर उपोषण मागे घेतलं.

या कामी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची 'चाणक्य नीती' कामी आली. त्यामुळे काँग्रसचे अध्यक्ष राहुल गांधी आणि नवनिर्वाचित उत्तर प्रदेशच्या पूर्व भागातील काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियाका गांधी यांच्या 'सिक्रेट प्लॅनवर' पाणी फेरलं. राळेगणसिद्धी येथील पत्रकार आणि स्थानिकांमध्ये सध्या हीच चर्चा जोरात सुरू आहे.

होय! अण्णांच्या आंदोलना दरम्यान राहुल गांधी आणि प्रियांका गांधी - वाड्रा या राळेगणसिद्धी येथे येतील आणि अण्णांची भेट घेऊन पाठिंबा देतील. अशी माहिती राज्य सरकारला मिळाली होती.त्यानंतर थेट दिल्लीहून चक्र फिरली आणि फडणवीसांनी 'मिशन राळेगण' फत्ते केलं.

राहुल - प्रियांकांच्या या सिक्रेट प्लॅनची खबर गुप्तचर यंत्रणांमार्फत सरकारला कळली. अशीही चर्चा आहे. त्यानंतर त्याची दखल थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतली आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अण्णांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यास सांगितले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विश्वासाला खरे उतरत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अण्णांशी यशस्वी बोलणी केली. यावेळी 6 तास झालेल्या चर्चेनंतर अण्णांनी अखेर उपोषण काही अटी आणि शर्तींवर मागे घेतले. राळेगणसिद्धी परिसरातील स्थानिक आणि पत्रकारांमध्ये अशी हीच चर्चा जोरात सुरू आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी आणि प्रियांका गांधी - वाड्रा यांच्या 'सिक्रेट प्लॅन'ला आपल्या चाणक्य नीतीच्या जोरावर धोबीपछाड दिल्याची चर्चा देखील स्थानिकांमध्ये रंगली आहे. अण्णांचा पवित्रा पाहता सरकारला हे उपोषण जड जाणार असंच काहीसं चित्र निर्माण झालं होत. पण, देवेंद्र फडणवीस यांनी त्या सहा तासांमध्ये सारी बाजी पलटवून टाकली.

'माझा वापर केला गेला'

दरम्यान, आंदोलनाबाबतीत सरकारनं दाखवलेली उदासिनता पाहून सुरूवातीच्या काही दिवसांमध्ये अण्णांनी नाराजी व्यक्त केली होती. 2013 साली भाजपनं माझ्या आंदोलनाचा राजकीय फायदा घेतला अशा शब्दात अण्णा हजारे यांनी आपली खंत न्यूज18 लोकमतकडे व्यक्त केली होती.

महाजनांची लागली कसोटी

जलसंपदा मंत्री गिरीश महाजन हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या विश्वासातील. आत्तापर्यंत अनेक महत्त्वाच्या कामगिरी फडणवीस यांनी गिरीश महाजनांच्या खांद्यावर दिल्या होत्या.यावेळी मात्र अण्णांची मनधरणी करण्यास त्यांना यश आलं नाही.पण, फडणवीसांच्या भेटीची पूर्वतयारी मात्र जोरात केली होती.

राज ठाकरेंनी घेतली अण्णांची भेट

अण्णा हजारे यांच्या उपोषणाला मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी देखील भेट देत जाहीर पाठिंबा दिला होता. यावेळी झालेल्या पत्रकार परिषदेदरम्यान राज यांनी सरकारवर देखील टिकास्त्र डागलं होतं.

या सर्व भेटींमुळं सरकारविरोधातील असंतोष वाढण्याची शक्यता होती.

==========================================

First published: February 8, 2019, 5:08 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading