Home /News /national /

दुसरं लग्न, कुटुंबात कलह, विश्वस्तांनी सोडलेली साथ ते जवळच्यांकडून विश्वासघात, Bhaiyyu maharaj आत्महत्या करण्याआधीचे 'ते' सात दिवस

दुसरं लग्न, कुटुंबात कलह, विश्वस्तांनी सोडलेली साथ ते जवळच्यांकडून विश्वासघात, Bhaiyyu maharaj आत्महत्या करण्याआधीचे 'ते' सात दिवस

भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली होती. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती.

    भोपाळ, 28 जानेवारी : दिवंगत अध्यात्मिक गुरु संत भय्यू महाराज यांच्या आत्महत्या प्रकरणात (Bhaiyyu maharaj suicide case) अटक करण्यात आलेल्या तीनही आरोपींना अखेर कोर्टाने सहा वर्ष कारावासाची शिक्षा सुनावली आहे. भय्यू महाराजांनी 12 जून 2018 रोजी स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या (Suicide) केली होती. त्यांच्या आत्महत्येच्या बातमीने संपूर्ण देशात खळबळ उडाली होती. भय्यू महाराजांचे देशभरात लाखो समर्थक होते. त्यांच्यासाठी हा खूप मोठा धक्का होता. एका अध्यात्मिक गुरुने अशाप्रकारे जगाचा निरोप घेणं हे कुणालाही अपेक्षित नव्हतं. भय्यू महाराजांनी ज्यादिवशी जगाचा निरोप घेतला त्यादिवशी त्यांच्या आश्रमाबाहेर समर्थकांची मोठी गर्दी उसळली होती. शेकडो डोळ्यांमध्ये अश्रू होते. महाराजांनी इतक्या टोकाचा निर्णय का घेताल, असा सवाल त्यांच्या भक्तांना सतावत होता. या प्रकरणात पोलिसांचा जसजसा तपास पुढे सरकू लागला तसतशा अनेक गोष्टी समोर येऊ लागल्या. भय्यू महाराज यांच्या घरातील कलह भय्यू महाराज यांनी आत्महत्या केल्यानंतर अनेक बातम्या समोर आल्या होत्या. त्यापैकी एक महत्त्वाची बातमी म्हणजे भय्यू महाराज घरातील गृहकलहाने देखील खचले होते. महराजांची मुलगी कुहू आणि दुसरी पत्नी आयुषी यांच्यात मतभेद होते. खरंतर कुहूला लंडनला पाठवण्यावरुन एक वाद होता. मुलीला लंडन पाठवलं तर दहा लाखांपेक्षा जास्त खर्च येणार होता. त्यामुळे घरातल्यांचा या गोष्टीला आक्षेप होता. दुसरीकडे भय्यू महाराजांची मुलगी कुहूने आपण आपल्या पहिल्याच आईला मानतो, असं म्हटलं होतं. तसेच आपण आपल्या आईचा दर्जा दुसरा कुणालाही देऊ इच्छित नाही, असंही ती म्हणाली होती. आपल्या बाबांनी लग्न केल्यानंतर काही दिवस आमच्या दोघांमधील बोलणं बंद झालं होतं, असं कुहूने त्यावेळी सांगितलं होतं. एकंदरीत या घटनेवेळी घरात गृहकलह होता हे निश्चत होतं. त्या तणावातही भय्यू महाराज त्रस्त होते. विश्वस्तांनी साथ सोडली भय्यू महाराजांनी दुसरं लग्न केल्यानंतर घरातील वाद चर्चेत आला होता. विशेष म्हणजे त्यामुळे त्यांची लोकप्रियताही घटत चालली होती. या सर्व घडामोडींमुळे सूर्योदय ट्रस्टशी संबंधित काही प्रमुख व्यक्तींनी, विश्वस्तांनी भय्यू महाराजांची हळूहळू साथ सोडली होती. त्यांनी आपापल्या पदाचा राजीनामा दिला होता. याशिवाय अनेक उद्योजक आणि देणगीदारांचीदेखील संख्या कमी होऊ लागली होती. त्यामुळे ते अस्वस्थ झाले होते. (भय्यू महाराज प्रकरणातील मोठी बातमी, पलकचं ब्लॅकमेलिंग ते दोन सेवकांचा धोका, आरोपींना वर्षोनुवर्ष कारावासाची शिक्षा) महाराज कर्जबाजारी झालेले महाराज आत्महत्या करण्याआधीचा काळ त्यांच्यासाठी खूप भयानक होता. कारण भय्यू महाराज कर्जबाजारी झाले होते. या कर्जबाजारीपणातून सुटका व्हावी यासाठी त्यांनी अनेक मालमत्ता विकल्या होत्या. या दरम्यान, त्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाकडून कर्ज घेतलेलं होतं. तो व्यावसायिक त्यांना पैशांसाठी फोन करायचा. त्यामुळे भय्यू महाराज त्रस्त असायचे. जेव्हा त्या बांधकाम व्यावसायिकाचा पैशांसाठी फोन यायचा तेव्हा महाराज अस्वस्थ व्हायचे. जवळच्यांकडून विश्वासघात, अश्लील व्हिडीओ बनून ब्लॅकमेलिंग भय्यू महाराज यांना आत्महत्या करण्यामागे सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे त्यांच्या जवळच्याच माणसांनी, सेवकांनी त्यांना खचवलं. त्यांच्या मनाला पोखरलं. त्यामुळे भय्यू महाराज चारही बाजूंनी अडकले होते. त्यांना या सगळ्यांमधून सुटका व्हावी यासाठी त्यांनी थेट आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला होता. पण तो निर्णय चुकीचा होता. भय्यू महाराजांसाठी अनेक वेगवेगळे मार्ग होते. पोलिसांची मदत घेता आली असती. समर्थकांना आवाहन करता आलं असतं. मुख्य म्हणजे कुटुंबियांची समजूत काढता आली असती. पण भय्यू महाराजांनी स्वत:पुरता त्रास करुन घेतला. अनेक गोष्टी करता आल्या असत्या. पण जवळच्यांनीच धोका दिल्याने ते खचले होते. भय्यू महाराजांचे दोन सेवक विनायक, ड्रायव्हर शरद आणि महिला केअरेटकर पलक यांनी फसवलं होतं. त्यांना महाराजांची संपत्ती हवी होती. त्यासाठी त्यांनी महाराजांना त्यांच्या जाळ्यात अडकवलं होतं. पलकने महाराजांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवत अश्लील व्हिडीओ बनवले होते. त्यानंतर ते व्हिडीओ शेअर करण्याची धमकी देत ब्लॅकमेलिंग केलं होतं. ते वारंवार त्यातून महाराजांकडे पैशांची मागणी करायचे.
    Published by:Chetan Patil
    First published:

    पुढील बातम्या