Home /News /national /

हे लोक उपाशी का आहेत? लेकीच्या निष्पाप प्रश्नाने हेलावला शेतकरी; एक ट्राॅली गव्हाची मदत केली उभी

हे लोक उपाशी का आहेत? लेकीच्या निष्पाप प्रश्नाने हेलावला शेतकरी; एक ट्राॅली गव्हाची मदत केली उभी

लेकीच्या प्रश्नाला बळीराजानं दिलेलं उत्तर ऐकताच कोणाच्याही डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही

    मंदसौर, 22 एप्रिल : कैलास गुर्जर घरात काहीतरी काम करीत होते. घराबाहेरील अंगणात त्यांची 8 वर्षांची लेक खेळत होती. त्यावेळी कैलास यांच्या दारासमोर एक मुलगी उभी असल्याचे दिसले. तिचे कपडे मळलेले होते. केस अस्ताव्यस्त होते. कदाचित ही शेजारील झोपडपट्टी भागातील असल्याचं त्यांना वाटलं. तिला पाहताच कैलास यांची मुलगी धावत तिच्याकडे जाऊ लागली. यावेळी कोरोनाची भीती कैलास यांच्या डोक्यात फिरत होती. आपली लेक त्या मुलीपर्यंत जाण्याआधीच त्यांनी तिला उचलून कडेवर घेतलं. मात्र त्यानंतर कैलास यांना खूप वाईट वाटलं. त्यांनी मुलीला विचारलं, 'कोण आहेत तू? काय हवंय तूला?' त्यावेळी हळूच आवाजात समोरील मुलगी म्हणाली, ‘भूक लागलीये...काहीतरी खायला द्या’ हे ऐकताच कैलास यांच्या पायाखालची जमीन सरकली. ते व्यवसायाने शेतकरी आहेत. त्यामुळे भूक काय असते हे त्यांना चांगलं कळतं. त्यांनी तिला थांबायला सांगितलं आणि हातात भाकरी आणि बिस्कीट घेऊन आले. कैलास यांच्या 8 वर्षांच्या लेकीनं भाकरी आणि बिस्कीट त्या मुलीला दिलं. जाताना कैलासने मुलीला तिच्या कुटुंबीयांविषयी विचारलं. आणि तेही तिच्यासोबत जाऊ लागले. जाण्यापूर्वी त्यांनी घरातून पीठ, डाळ, तांदूळ भरलेल्या पिशव्या घेतल्या. खायाला मिळणार या आशेने ती मुलगी खुलली आणि ते तिघेही झोपडपट्टीच्या दिशेने निघाले. यावेळी कैलास यांच्या लेकीने विचारलेल्या प्रश्न खरंच आपल्याला खोल विचार करणारा होता. त्यावरचं उत्तर देणं खरचं अवघड आहे. तिने विचारलं, 'बाबा हे लोक उपाशी का आहेत?' यावर मुलीला कोरोना, लॉकडाऊन याबाबत  काय सांगू आणि ते तिला कळेल का हा प्रश्न त्यांना पडला. त्यावेळी ते काहीच बोलले नाही. मात्र हा प्रश्न त्यांच्या डोक्यात फिरत होता. झोपडपट्टीत जाऊन त्यांनी हातातील सामान त्या उपाशी कुटुंबाला दिलं. मात्र यावर कैलास थांबले नाहीत. ते कलेक्टर ऑफिसात गेले आणि तेथून झोपडपट्टीतील इतर कुटुंबीयांना मदत करण्याचं ठरवलं. यावेळी त्यांनी इतर शेतकरी मित्रांना गोळा केले. आणि प्रत्येकाने आपल्याला शक्य तितकी मदत केली. साधारण 1 ट्राॅली गव्हाची मदत यानिमित्ताने जमा झाली. झोपडपट्टीतील नागरिकांच्या घरातील चूल आज पेटणार होती. कैलास घरी आल्यावर त्यांनी मुलीला तिने विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर दिलं, ते म्हणाले ‘त्यांच्या घरातील सामान संपलं होतं. आता आम्ही सामान भरून आलोय. आता ते उपाशी नाही राहणार’. लेकीच्या एका प्रश्नाने आज अनेकांच्या घरातील चूक पेटली. संबंधित - चीनमध्ये 2 महिन्यांनंतरही शरीरात व्हायरस जिवंत, बऱ्या झालेल्यांना पुन्हा कोरोना
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Farmer

    पुढील बातम्या