नवी दिल्ली, 15 जानेवारी : कोरोनावर मात करण्यासाठी अखेर आजपासून देशभरात लसीकरण (coronavirus vaccine) सुरू झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी कोरोना लसीकरणाचा शुभारंभ केला आहे. यावेळी त्यांनी कोरोनाची लस कुणाला आणि कधी दिला जाणार आहे, याबद्दल महत्त्वाचा खुलासा केला आहे.
'लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात 3 कोटी जणांना लस देण्यात येईल तर दुसऱ्या टप्प्यामध्ये 30 कोटी जणांना लस देण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यामध्ये वृद्ध व्यक्ती, गंभीर आजार असलेल्या व्यक्ती आदींचा समावेश असेल, अशी माहिती पंतप्रधान मोदी यांनी दिली.
Launch of the #LargestVaccineDrive. Let us defeat COVID-19. https://t.co/FE0TBn4P8I
— Narendra Modi (@narendramodi) January 16, 2021
तसंच, 'ज्यांना कोरोनाची लागण होण्याची शक्यता सर्वाधिक आहे. जे कोरोना रुग्णांच्या जवळ आहे त्यांना सर्वात आधी कोरोनाची लस दिली जाणार आहे. डॉक्टर, आरोग्य कर्मचारी हे कोरोना लशीचे पहिले मानकरी असणार आहे. मग शासकीय डॉक्टर असतील किंवा खासगी असतील, त्या सर्वांना सर्वात आधी लस दिली जाणार आहे. अत्यावश्यक सेवेत काम करणारे पोलीस, कर्मचारी, जवानांना कोरोनाची लस दिली जाणार आहे. याची संख्या तीन कोटी इतकी आहे. या कोरोना लशीचा खर्च हा केंद्र सरकार उचलणार आहे, अशी घोषणाही मोदींनी केली.
तसंच, 'कोरोना लसीचे 2 डोस घेणे आवश्यक आहे. पहिल्या आणि दुसऱ्या डोसमध्ये एका महिन्याचे अंतर असेल. दुसरा डोस घेतल्यानंतर दोन आठवड्यानंतर आपल्या शरीरात कोविड 19 विरुद्ध प्रतिकारशक्ती निर्माण होणे सुरू होईल', असंही मोदी यांनी सांगितले.
कोव्हिन डिजीटल प्लॅटफॉर्मवर (cowin app) लस घेण्यासाठी व्यवस्था केली आहे. या अॅपमधून पहिली लस दिल्यानंतर दुसरी लस कधी देणार आहे, याची माहिती दिली जाईल. कोरोना लसीचे दोन डोस घेणे गरजेचं आहे. पहिल्या आणि दुसऱ्या लशीचा डोस घेण्यामध्ये एक महिन्याचा वेळ लागतो. लस घेतल्यानंतर तुम्ही बिनधास्तपणे वागू नका, मास्क वापरणे सोडू नका, सोशल डिस्टन्सिगचे नियम मोडू नका. लस घेतल्यानंतर सुद्धा हे नियम कायम राहणार आहे, असंही मोदी यांनी ठणकावून सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.