नवी दिल्ली, 18 नोव्हेंबर : गेल्या वर्षी गलवान खोऱ्यात झालेल्या चकमकीनंतर भारत आणि चीन (India-China) यांच्यादरम्यान तणावाचे वातावरण आहे. चर्चेच्या अनेक फेऱ्या झडल्यानंतर दोन्ही देशांनी आपापली सैन्यं मागे घेतली आहेत; मात्र तरीही तणाव पूर्ण मिटलेला नाही. यापूर्वी भारत आणि चीन आमने-सामने आले असून भारत आणि चीनच्या या वादाचा इतिहास जुना आहे. भारत आणि चीनमध्ये काही लढाया झाल्या आहेत. यातली एक लढाई म्हणजे 1962 साली (India-China 1962 War) भारत-चीनदरम्यान झालेलं रेजांग लाचं युद्ध होय. या युद्धात पराक्रमी मेजर शैतान सिंग (Major Shaitan Singh) यांच्या नेतृत्वाखाली 114 ते 120 शूर भारतीय जवानांनी 1300 चिनी सैनिकांचा खात्मा केला आणि इतिहासाच्या पानावर सोनेरी अक्षरात आपलं नावं कोरलं. या घटनेला आज 59 वर्षं उलटून गेली आहेत. आजही त्यांच्या पराक्रमाची कथा तितक्याच उत्साहाने सांगितली जाते. आज (18 नोव्हेंबर) संरक्षणमंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) रेजांग ला इथल्या स्मारकाला भेट देणार असून, शहिदांना श्रद्धांजली अर्पण करणार आहेत.
मेजर शैतान सिंग हे 13 कुमाऊंच्या चार्ली कंपनीचे नेतृत्व करत होते. 18 नोव्हेंबर 1962 रोजी त्यांनी चिनी सैन्याचा धैर्याने सामना केला. त्यांच्याकडे जवान आणि शस्त्रास्त्रंही कमी होती; मात्र त्यांनी साथीदारांमध्ये उत्साह निर्माण केला आणि त्यांना हुशारीने लढण्याची सूचना केली. त्यांच्या नेतृत्वाखाली भारताच्या फक्त 120 जवानांनी चीनच्या 2000 सैनिकांविरोधात जोरदार लढा देऊन त्यांच्यावर मात केली. या पराक्रमाबद्दल त्यांना परमवीरचक्र या अत्युच्च सैनिकी सन्मानाने मरणोत्तर गौरविण्यात आलं.
दिवस होता 18 नोव्हेंबर 1962. पहाटेचे 4 वाजले होते. चिनी सैन्याच्या सुमारे 2000 सैनिकांनी भारताच्या सुमारे 114-120 सैनिकांच्या तुकडीवर हल्ला केला. कडाक्याची थंडी आणि दुसरीकडे शत्रूंकडून गोळ्यांचा वर्षाव; मात्र भारतीय जवानांनी धैर्याने शत्रूचा सामना केला. चिनी सैनिक जेव्हा फायरिंग रेंजवर येतात, तेव्हाच त्यांच्यावर गोळीबार करावा, अशी रणनीती आखण्यात आली. मेजर सिंग यांनी सैनिकांना एका गोळीबारात एका चिनी सैनिकाला मारण्यास सांगितले. या रणनीतीवर काम करून भारतीय लष्कराने चिनी सैनिकांना हुसकावून लावले.
हे ही वाचा-राष्ट्रपती भवनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह, बॅरिकेड्स तोडत आतमध्ये घुसली कार
दोन्ही सैन्यांदरम्यान सुमारे 18 तास हे युद्ध चाललं. या युद्धात भारतीय लष्कराचे 114 जवान शहीद झाले. गोळीबारानंतर चिनी सैन्याला पळवून लावल्याचा संदेश वरिष्ठांना देण्यात आला; मात्र काही वेळाने चिनी सैन्याने पुन्हा गोळीबार केला. यात भारतीय लष्कराचे तीन बंकर उद्ध्वस्त झाले. स्फोटातच शेलचा तुकडा मेजर सिंग यांच्या हाताला लागला आणि ते जखमी झाले. सहकारी जवानांचं सांगण न ऐकता ते लढत राहिले. त्यांनी मशीनगन मागवली आणि त्याचा ट्रिगर हात जखमी झाल्याने पायाला बांधला.
हे ही वाचा-कोळशावरून इतर देशांनी केला भारताविरोधात जळफळाट, चीनने मात्र दिली साथ
पायाच्या साह्याने ते शत्रूंवर गोळ्या झाडत होते. तोपर्यंत प्रचंड रक्तस्राव झाल्याने त्यांची प्रकृती बिघडली. बर्फाळ प्रदेशात झालेल्या या युद्धात सुभेदार रामचंद्र यादव यांचाही मोठा वाटा होता. त्यांनी मेजरना पाठीवर बांधलं. त्यांनी मेजर सिंग यांना दगडाच्या आधाराने झोपवलं; मात्र काही वेळातच सिंग यांनी जगाचा निरोप घेतला. या युद्धात 114 भारतीय जवान शहीद झाले, तर 5 जणांना युद्धकैदी बनवण्यात आले होते; पण भारताने सुमारे 1300 चिनी सैनिकांना ठार मारलं होतं.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: China, India china, Indian army