मराठी बातम्या /बातम्या /देश /नासाच्या चांद्रमोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेले डॉ. अनिल मेनन कोण आहेत?

नासाच्या चांद्रमोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून निवड झालेले डॉ. अनिल मेनन कोण आहेत?

dr anil menon

dr anil menon

नासाच्या चांद्रमोहिमेसाठी प्रशिक्षणार्थी म्हणून भारतीय वंशाचे डॉ. अनिल मेनन (Dr Anil Menon) यांची निवड करण्यात आली आहे.

  नवी दिल्ली, 8 डिसेंबर:  नासा या अमेरिकी अंतराळ संशोधन संस्थेने आखलेल्या चांद्रमोहिमेसाठी 10 प्रशिक्षणार्थी अंतराळवीरांची निवड केली आहे. त्यात 6 पुरुष आणि चार महिलांचा समावेश असून, त्यात भारतीय वंशाचे डॉ. अनिल मेनन (Dr Anil Menon) यांचाही समावेश आहे. यातून डॉ. अनिल मेनन यांची अंतिम मोहिमेसाठीही निवड झालीच, तर चंद्रावर पाऊल टाकणारे ते पहिले भारतीय (First Indian to land on Moon) ठरतील. त्यामुळे ही मोहीम विशेष आहे.

  नासाच्या (NASA Moon Mission) या मोहिमेअंतर्गत 2024-25मध्ये चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर माणसाला उतरवण्याचं नियोजन आहे. या मोहिमेसाठी प्रशिक्षण घेण्याकरिता 10 जणांची निवड करण्यात आली असून, त्यात डॉ. अनिल मेनन यांचा समावेश आहे. त्यासाठी तब्बल 12 हजार अर्ज आले होते. त्यातून निवड झालेल्या सर्व 10 जणांना जानेवारीपासून टेक्सासमधल्या जॉन्सन स्पेस सेंटरवर सुरू होणारं दोन वर्षांचं खडतर प्रशिक्षण पूर्ण करावं लागेल. त्यानंतर आर्टेमिस जनरेशन प्रोग्राममध्ये त्यांनी सहभागी व्हावं लागेल. चंद्रावर जाण्यासाठी या सर्व 10 जणांची निवड होईल की नाही, याबद्दल आत्ताच काही सांगता येत नाही.

  अमेरिकेच्या हवाई दलात लेफ्टनंट कर्नल म्हणून कार्यरत असलेल्या डॉ. अनिल मेनन यांनी नासाच्या आंतरराष्ट्रीय अवकाश स्थानकावर जाणाऱ्या अनेक अंतराळ मोहिमांमध्ये क्रू फ्लाइट सर्जन (Crew Flight Surgeon) म्हणून जबाबदारी निभावली आहे. भारत आणि युक्रेनमधून अमेरिकेत गेलेल्या दाम्पत्याच्या पोटी अनिल मेनन यांचा जन्म अमेरिकेत मिनेसोटामधल्या मिनियापोलिसमध्ये 1976 साली झाला. मिनेसोटामध्येच त्यांचं शिक्षण झालं. 1999 साली हार्वर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी न्यूरोबायोलॉजी विषयात ग्रॅज्युएशन केलं. तसंच 2004 साली कॅलिफोर्नियामधल्या स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमधून त्यांनी मेकॅनिकल इंजिनीअरिंगचं शिक्षण घेतलं. स्टॅनफर्डमधूनच ते डॉक्टरही झाले. पोलिओ अभियानाच्या अभ्यासासाठी डॉ. मेनन भारतात आले होते आणि त्यासाठी त्यांनी भारतात एक वर्ष वास्तव्यही केलं होतं.

  2014 साली नासामध्ये फ्लाइट सर्जन म्हणून भूमिका निभावलेल्या डॉ. मेनन यांनी 2018 साली एलॉन मस्क यांच्या स्पेसएक्स (SpaceX) कंपनीत प्रवेश केला. स्पेसएक्सच्या पहिल्या मानवी उड्डाणाच्या वैद्यकीय कार्यक्रमात डॉ. मेनन यांचा सहभाग होता. स्टारशिपची निर्मिती, अॅस्ट्रॉनॉट प्रोग्राम, लाँच प्रोग्राम आदींमध्येही ते कार्यरत होते. त्यांच्या या वैविध्यपूर्ण अनुभवामुळेच कदाचित त्यांची या मोहिमेसाठी निवड झाली असावी.

  आतापर्यंत चार भारतीय अंतराळात जाऊन आले आहेत. राकेश शर्मा हे पहिले भारतीय अंतराळवीर होते. त्यानंतर भारतीय वंशाच्या कल्पना चावला यांनीही अंतराळवारी केली होती; मात्र मोहीम संपवून परत येताना झालेल्या दुर्घटनेत त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. त्यानंतर भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स आणि राजा चारी यांनीही अंतराळवारी केली आहे. आतापर्यंत एकही भारतीय चंद्रावर उतरलेला नाही. डॉ. अनिल मेनन यांची अंतिम मोहिमेसाठी निवड झाली, तर ते चंद्रावर जाणारे भारतीय वंशाचे पहिलेच ठरतील.

  आत्ता डॉ. अनिल मेनन यांच्यासह अमेरिकेच्या हवाई दलातले मेजर निकोल एयर्स आणि मेजर मार्कोस बॅरिओसो, अमेरिकेचे मरीन कॉर्प्स मेजर (निवृत्त) ल्यूक डेलाने, अमेरिकेच्या नौदलाच्या लेफ्टनेंट कमांडर जेसिका विटनर आणि लेफ्टनेंट डेनिज बर्नहॅम, अमेरिकी नौदल कमांडर जॅक हॅथवे, ख्रिस्तोफर विल्यम्स, ख्रिस्तिना बिर्चो आणि आंद्रे डग्लस या अन्य नऊ जणांची या मोहिमेसाठी निवड झाली आहे.

  First published:

  Tags: Nasa