नवी दिल्ली, 05 जानेवारी: दोन महिन्यांच्या वाद आणि भांडणानंतर आज भारताचे आजी पंतप्रधान मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना जाऊन भेटले. दोघांनी हातमिळवणी केली. थोड्या गप्पाही मारल्या.
तर झालं असं की आज राज्यसभेचं कार्यकाल संपल्याचं सभापती व्यंकय्या नायडू यांनी जाहीर केलं. त्यानंतर सत्ताधारी विरोधकांना भेटायला गेले. भाजप आणि काँग्रेसचे खासदार एकमेकाला भेटले. याचवेळी पंतप्रधान मोदीही विरोधकांना भेटायला गेले. तेव्हाच ते स्वत: माजी पंतप्रधान मनमोेहन सिंग यांना भेटले. त्यांची ख्याली खुशहालीही त्यांनी विचारली. गेले दोन महिने एकामेकावर प्रचंड टीका करणारे देशाचे दोन पंतप्रधान एकमेकाला भेटण्याची अशी वेळ विरळच असते.
गुजरात निवडणुकीमध्ये सरकारच्या नोटाबंदीच्या धोरणावर मनमोहन सिंग यांनी सडकून टीका केली होती. तर मनमोहन सिंग यांनी पाकिस्तानशी हातमिळवणी केल्याचा आरोप मोदींनी केला होता. याबद्दल त्यांनी माफी मागावी अशी मागणीही सिंग यांनी केली होती. एवढंच काय तर दोन्ही सभागृहांमध्ये याचा निषेधही करण्यात आला . पण अखेरपर्यंत माफी मागितली गेली नाही.
मनमोहन सिंग आणि मोदी भेटल्यामुळे त्यांच्यातील वाद मिटला असेल का आता हे येणारा काळंच ठरवेल .